पान:तरंग अंतरंग.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उधळायचं. हीच म्हणे जिंदगी ! फार वाईट दिवस आले मला. पूर्वी बघा, नुसतं पास झाला की, पेढेच वाटायचे. कुठल्याही म्युनिसिपालिटीची असो; इंग्लिश असो, मराठी असो, कसलीही शाळा आणि युनिफॉर्म म्हणाले तर कुठलीही चड्डी (नको तिथं फाटलेली पण) गळते, म्हणून कायम कमरेवर घट्ट धरावी लागली तरी (दादाचीच, वंशपरंपरेने चालत किंवा फाटत आलेली). सगळाच आनंद ! आणि डब्यात तरी काय, ते कुरकुरे का टूरटूरे, पिझ्झा बिझ्झा काय नाय लागायचं; मायच्या हातावर थापलेली, मस्त विस्तवावर खमंग भाजलेली भाकरी आणि दाण्याची चटणी. निखाऱ्यावर भाकरी भाजताना मायचे हात पण भाजायचे बिचारीचे; पण हूं नाय का चू नाय. पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच तिची जिंदगी. वर, आणि पदरानं पोराचं नाक पुसून, लोण्यासारखी मऊ पापी गालावर ठेवून, डोक्यावरनं हात फिरवून शाळेला जायला निरोप दिला की, तिचं जगणं सोन्याचं होऊन जायचं. डोळे पुसत देवाच्या फोटोला हात जोडले की, तिला पोराच्या लई मोठ्ठा होण्याची खात्री असायची. गाठीला फार काय पैसा नसायचा, भविष्यात पुरेल एवढं धान्यही नसायचं, तरी पाच- धा पाव्हनं-रावळं आनंदानं वाढायची ती माय. प्वॉट सुटलं म्हणून पळायला, फिरायला कधी नाय गेली. बहुतेक वेळा पोट समाधानानं आणि भांडंभर गार पाण्यानंच भरायचं. ही पण एक जिंदगी म्हणजे 'मी'च होते. म्हणूनच मी दुकान काढायचं ठरवलं. म्हटलं, लोकांना पहिल्यासारखं सुखी- समाधानी, आनंदी राहू दे. माझ्याही ते हिताचच होतं की. मी दुकानात सगळ्या 'ऑफर्स' व्यवस्थित मांडल्या. भुकेलेल्याला पोटभर जेवायला घालून मिळणाऱ्या समाधानावर दोन तहानलेल्यांना गार पाणी आणि गुळाचा खडा दिल्याचं समाधान फ्री! गरीब विद्यार्थ्याला वही- पुस्तकाचं समाधान द्या; वर त्यानं तुमच्या म्हातारपणीच्या आरोग्यासाठी देवाकडं साकडं घातल्यानं मिळणारं लाखमोलाचं समाधान फ्री! नुसतं आंधळ्याला हात धरून रस्ता क्रॉस करून मिळवलेल्या समाधानावर, जन्मभर शुद्ध स्वच्छ नजरेचा नजराणा तहहयात फ्री ! एकट्या-दुकट्या पोरीवर अनाचार करणाऱ्याच्या मध्ये फक्त मुठी आवळून उभे राहण्याचं समाधान घ्या, वर जन्मभर आया-बहिणींची निखळ, अमाप माया-प्रेम, जन्माला पुरतील एवढे आशीर्वाद आणि पाठीवर प्रेमानं फिरणारे उदंड हात फ्री मिळवा. माझ्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर 'ऑफर्स'नी दुकान गच्च सजवून टाकलं. आज दुकान उघडून सात दिवस झाले. माझं मन जड-जड झालं. बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. माझ्या दुकानात अजून एकही गिऱ्हाईक नाही फिरकलं. पाठवता का हो एखादं ...? "मी हात जोडते. नका दुकान बंद करायला लावू मला प्लीज, प्लीज....' 11 ܀܀܀ तरंग अंतरंग / ९२