पान:तरंग अंतरंग.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मागे वळून पहाताना... मला वाटतं माणसानं सारखं मागे वळून बघून मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही. अनेक फुटकळ गोष्टी घडतच असतात. वयाच्या या टप्प्यावर पुढं जातच रहाण्याची, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी धडपड सुरूच असते. बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य, भविष्याच्या बेजमीची व्यवस्था, मुलाबाळांना त्यांच्या जीवनाच्या निदान शिडीच्या पहिल्या पायट्यावर उभे करण्याची व्यवस्था इथंपर्यंत ही धडपड सुरूच असते ! पुढची पिढी कुटुंबाच्या तुम्हाला अपेक्षित जबाबदाऱ्या, चालीरिती वगैरेसाठी सक्षम झाली की आपण थोडे मनाने सैल व्हावे! मग मावळत्या सुर्यानं आपला लालसर, गुलाबी मलमलीच्या चुण्या चुण्याचा शेला निवांतपणे, अलगद नदीच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यावर सोडलेला पहात, साथीदाराच्या खांद्यावर हात टाकून, घाटावर बसून आपल्याही गतआयुष्याच्या चित्रपटाचे रीळ हळुवार त्या लालगुलाबी शेल्याबरोबर उलगडावेत. काही जोडीदार सांगेल, काही आपण सांगावे. चिमणा चिमणी नाही का आपल्या पिलांचे रक्षण पोषण करीत घरट्याच्या दारात अखंड चिवचिवाट करत असतात, अगदी तसे ! अगदी दोघांच्याही बालपणापासूनच्या पुस्तकात जपलेल्या मोरपिशी आठवणीपासून ते संसारातली धुसपुस, रागावणं, रुसणं अत्यंत लाडीगोडीत समजूत घालणं इथंपर्यंत गोतावळ्यातील नातेसंबंध, जोजवलेली सामाजिक बांधिलकी अशा अगणित आठवणींच्या गाठोड्यांच्या गाठी एकएक करून हळुवार सोडाव्यात! पहा या आठवणी दोघांनाही कुठं कुठं आणि किती गुंगवून टाकतात, रंगवून सोडतात ते! अगदी बोबडे बोलण्याच्या वयापासून ते जोडीदारांची पहिल्या रात्रीच्या धडधडीचा, मंद प्रकाशातला रंगमंच! नुसत्या आठवणीची चुणूकसुद्धा साऱ्या आयुष्यभर चोरून, कुणी पहात तर नाही ना या धाकधुकीत, कधीही वेळीअवेळी गालावर उमटणारी चोरटी स्मितरेखा चुणी कोरून जाते. नोकरीत कसे जीवनमरणाचे प्रश्न निर्माण झाले होते, त्यावेळी कुशीत घेऊन एकमेकाला दिलेला पोलादी आधार ! ओठांनी अगदी हळुवारपणे ते अश्रू टिपणे! नव्या जीवाची चाहुल ! मिळालेल्या बढत्या, त्यामुळे जरा सैल झालेले आर्थिक बंधन आणि मस्त एन्जॉय केलेल्या सहली, मेजवान्या, चित्रपट, नाटके ! एक का दोन हजारो प्रसंगाचा हा कॅलिडोस्कोप पाहता पाहता स्वच्छ चंदेरी प्रकाशाचा सडा टाकत प्रवेश करणारा तो चंद्रमा, आठवणींच्या वीणेचे झंकार छेडत केंव्हा भैरवीला सुरवात करेल कळणार देखील नाही! मग थोडं नाइलाजानं का होईना, उठावं ! घरट्यात मोठी झालेली पिलं आता काळजी करू लागली असतील! त्यांनाही आईबाबांचा सहवास, हृदयाच्या खोल कप्प्यात त्यांच्या उतार वयापर्यंत जोजवायचा असतो! अगदी शैशवापासून शेवटच्या ९३ / तरंग अंतरंग