पान:तरंग अंतरंग.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुकान रोज टीव्ही चालू केला रे केला किंवा पेपरचं वरचं पान पालटलं की, जाहिरातीच जाहिराती. हल्ली तर पानही उलटावं लागत नाही, कारण वरचंच पान जाहिरातींनी व्यापलेलं असतं एकावर एक फ्री, पाचवर दोन फ्री, एक्सचेंज ऑफर, जुने, फाटके कपडे पण आणा आणि दोन नव्या कोऱ्या पँटस् तीस टक्के किमतीत हसत घेऊन जा. अबब... काय या जाहिराती ! एवढ्या जाहिराती पाहून खरेदी करायची ठरवली तर जिंदगी कमी पडेल. अर्थात प्रत्येकजण आपली जिंदगी कशी घालवायची ते ठरवत असतो. प्रत्येकाची जिंदगी वेगळी यावरुनच एक गंमतीशीर विचार सुचला तो म्हणजे या जिंदगीनेच जर आपलं मन मोकळं करायचं ठरवलं आणि ती बोलू लागली तर ? ती तर बुचकळ्यातच पडली. प्रत्येक ठिकाणी तोबा गर्दी! जरूर असो वा नसो; बस, खरेदी करायचीच. मग तिनं ही ठरवलं, आपणही आता दुकान काढू. तर मग जिंदगीनं स्वतःचचं दुकान उघडलं. लावली चौकाचौकांत मोठमोठी पोस्टर्स. पोस्टरवर फोटो स्वतःचाच ; मस्त सिल्क साडीतला, फक्त चेहरा पूर्ण कोरा. तिला प्रश्न पडला होता आता जिंदगीचा; म्हणजे स्वतःचा, चेहरा हसरा दाखवायचा की दुःखी का निराश ? कारण जिंदगी कुणी मस्त 'एन्जॉय' करत होते, कुणी तक्रार करतच दिवस ढकलत होते; तर कुणी 'बाटलीला'च जिंदगी समजले होते, तर कुठे बाटलीच्या जोडीला ; पण जाऊ दे, खाजगी बाब रस्त्यावर कशाला उघडी करायची ? आणि कुठे-कुठे, कुणी बिचाऱ्यांनी जिंदगी झाडावर फासावरच लटकवून ठेवलेली! खरं तर जिंदगीला स्वतःलाच खूप वाईट वाटलं, लाजही वाटली. आपण स्वतःला खुशी-खुशी प्रत्येक माणसाच्या स्वाधीन केलं आणि हे काय मांडलंय ? कुणालाही स्वाधीन केल्या- केल्या बारसं काय करतील, फुगे काय लावतील! मी जर का एखाद्या घरी जायला उशीर केला, तर वाजंत्रीही लावतील. अहो, तरी एक बरं होतं, माझ्या बारा-तेरा वर्षांपर्यंत मस्त मजा येते. पावसात काय भिजतील, उंच रहाटावरनं विहिरीत उड्या काय मारतील, डोंगरावर काय चढतील, झाडावर चढून चिंचा, आंबे, आवळे काय काढतील, तिखट-मीठ लावून सगळ्यांना काय वाटतील; अगदी उष्टसुद्धा देऊन वर म्हणतात, 'चिमणीच्या दातानं तोडलंय. ' मुलींच्या वेण्या काय ओढतील, फाटक्या पोलक्यात हळूच बर्फ टाकून पळून काय जातील. माझा हा एवढा काळ म्हणजे अगदी सोन्यासारखा! 'मोठा झाल्यावर भीक का मागणार आहेस ?' या एकाच प्रश्नाचं भूत घरातल्या थोर विचारवंतां'नी एकदा का मानगुटीवर बसवलं की झालं, करपून टाकतात हो मला. आणि माझ्या लक्षात आलं, तो बालपणीचा निखळ आनंद आता काही कामाचा नाही. पैसा असो नसो, जरुरी असो नसो, उपयोगी असो नसो, घरी जागा असो नसो; एक क्रेडिट कार्ड घ्यायचं आणि 'एकावर एक फ्री' वाली दुकानं पालथी घालत बाजारभर ९१ / तरंग अंतरंग