पान:तरंग अंतरंग.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ना ? मग जड झालेले कसे काय कळते बुवा ?) बहुधा याला आपण पुन्हा कधीही बघणार नाही, याच पक्क्या समजुतीनं हात हलवत निरोप दिला. आयला, म्हणजे या गल्लीत हा 'नाटका'चा प्रयोग नित्याचाच की काय 'रथ' आता मरणाच्या घाईनं गर्दी कापत मागे वाघ लागल्यासारखा धावू लागला. मी हळूच खरंच मागं वाघ लागला आहे का, ते कष्टाने मान उंचावून मागील काचेतून बघून घेतलं. मागून फक्त 'सर्जन' एकदम खुशीत रुमालाला हात पुसत (हात धुऊन मागं लागायचं असल्यानं हात ओले झाले असावेत.) 'फेरारी'त बसून पाठलाग करत होता. 'फाईव्ह स्टार' हॉस्पिटलमध्ये 'रथ' घुसल्याबरोबर पुन्हा एकदा मघाशी उभा राहिलेला सीन स्टेजवर उभा राहिला आणि गंभीर चेहऱ्याची जनता गोळा झाली. लगेच ढकलगाडी आली. तत्परतेने मीच मला चालताच काय इव्हन एक हजार मीटर पळता पण येते, असे सांगूनही 'त्या' ढकल गाडीवर आडवे पाडले. मला पळता येते, हे ऐकून एव्हाना मागून आलेल्या ’सर्जन'च्या इशाऱ्यानं दोघांनी माझे पाय घट्ट धरले. आयुष्यात प्रथमच कुणी तरी माझे पाय धरले होते, तेव्हा गहिवरून मीही मनोमन त्यांना माफ करून टाकलं. 'ऑपरेशन थिएटर'मध्ये ('थिएटर' नाव हे डॉक्टर मंडळींनी मुद्दामच दिलं असावं म्हणजे नवनवे 'प्रयोग' करून पाहायला बरे..!) गेल्याबरोबर बेशुद्ध पाडण्याची तयारी सुरू झाली. मला अमेरिकेतील आर्ट गॅलरीत पाहिलेल्या इतिहासकालीन पाच-सहा तगड्या जवानांनी हात-पाय घट्ट धरून ठेवल्यावर जंतुविरहित करण्यासाठी आगीत लालबुंद केलेल्या शस्त्राने वार करण्यास 'सज्ज' असलेल्या लांब पांढऱ्या दाढीवाल्या 'सर्जरी स्ट्रायकर'चे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. अजून 'सर्जन'नं इशारा केला नव्हता. माझ्यासह सारेच 'त्या' यमदूताची वाट पाहत होते. पांढरे शुभ्र (पांढरा रंग शुभ की अशुभ, हा विचार मनात आलाच. ) कपडे घालून हातात ग्लोव्हज् चढवत, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून म्हणाले, "हं. देशपांडे, बोला काय - काय होतंय ?" अरेच्च्या...! हा प्रश्न इथं आडवं पडल्यावर विचारतात ? हे मला नवलच होतं. सारं धैर्य गोळा करून मला ॲनस्थेशिया देणाऱ्या 'पापभिरू' डॉक्टरकडे बघत मी गडबडीने एवढंचं म्हणालो, "डॉक्टर, माझं नाव कुलकर्णी आहे."

तरंग अंतरंग / ९०