________________
'सर्जिकल स्ट्राईक' 'सर्जिकल स्ट्राईक' हा शब्द आता एवढा 'कॉमन' झाला आहे की, गल्ली-बोळातलं शेंबडं पोर पण ही 'सर्जरी' उमजून चुकलंय. मुंबईतल्या एका 'प्रख्यात' सर्जनचा ठावठिकाणा शोधताना, हे मला उमजलं. कोपऱ्यावरच्या झाडाआड उभ्या असलेल्या एका अशाच शेंबड्या पोरानं मी " सर्ज..." एवढं म्हटल्याबरोबर इन्स्टंटली उजव्या हातानं खुणेनंच 'गल्लीत जाऊन डाव्या हाताचं चौथं घर' एवढा मजकूर न लिहिता, न बोलता सांगितला. भारताच्या 'उज्ज्वल' भविष्याची कल्पना एका मिनिटात येऊन माझे डोळे उगीचच भरून आले. मी त्याचे आभार मानण्यासाठी पुढं काही बोलणार होतो; पण तो ज्या 'प्रभात' काळच्या 'विहित' कार्यासाठी झाडाआड आला होता, त्या कामात गुंतला होता. (कुंथला म्हटलं तरी चालेल.) आता मला कळलं, तो उजव्या हाताने खुणा का करत होता ? मला बघून एकदम 'उतिष्ठ स्टान्स' घ्यावा लागल्याने त्याचा डावा हात त्याची अर्धवट घसरलेली चड्डी सावरण्यात गुंतला होता. मी त्याला अचानक पत्ता विचारून त्याच्यावर 'सर्जिकल स्ट्राईक'च केला होता. असो. नमनाला चमचाभर तेल पुरे. (आता नमनाला घडाभर तेल परवडत नाही. ) मी त्या चड्डी सावरणाऱ्या मुलाने सांगितलेल्या पत्त्यावर अचूक आणि वेळेत पोहोचलो. तर 'सर्जन' एकदम ताजेतवाने होऊन प्रसन्नपणे माझी वाटच पहात होते. 'ताजेतवाने' हा शब्द खरकटा तवा घासून पुन्हा स्वच्छ गोरा करणे, या अर्थानेच आला असावा. म्हणजे पुन्हा जाळावर चढून सीतामाईंच्यासारखं 'अग्निदिव्य' करायला तवा मोकळा. असो, त्या सर्जननी माझ्याकडे फक्त कटाक्ष टाकून, वर अनेक वर्षांची ओळख असल्यागत हसत-हसत (बहुधा छद्मी) ईदच्या बकऱ्यावर फिरवतात, तशी नजर फिरवत 'अजून मला काय होतंय,' हे सांगायच्या अगोदरच 'अॅम्बुलन्स' बोलावली. त्यांच्या या 'अगाध' ज्ञानाला सलाम करत मीही बळी जायला स्वातंत्र्यसैनिक असल्याच्या थाटात हसत-हसत, क्षणात दाराशी मोठमोठ्याने सायरन वाजवत आलेल्या त्या यमदूताच्या 'रथा'वर आरूढ झालो. साहजिकच मला वाटलं की, माझी तपासणी हॉस्पिटलमध्येच होणार असेल. 'सायरन' च्या आवाजाने एका मिनिटात गल्लीतल्या, लुगड्याला हात पुसत काही बायका, लेंग्याची नाडी बांधत कुणी 'सत्पुरुष', शाळेला निघालेली मुला-मुलींची गँग असे गोळा झाले. चड्डीला ओला हात पुसत छाती पुढे काढून ते मगाचं कोपऱ्यावरचं 'निष्पाप' कारटंही, कसा आपण 'बकरा' पकडून दिला, या थाटात हाताची घडी घालून, डोळ्यात करुण रस भरून उभं ठाकलेलं. मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. त्याच्या डोळ्यातला 'तो' भाव बघून आता मात्र मी चुकीच्या 'सर्जन'कडे अडकलो की काय, या शंकेने घायाळ किंवा गलितगात्र (का गल्लीत गात्र ? ) की काय, म्हणतात तसा होऊन मान खाली घालून (ईदच्या बक-यासारखी) मुकाट्याने 'रथा रूढ झालो. उभ्या जनतेने डोळे पुसत नमस्कार करत जड अंतःकरणाने (आयला, अंतःकरण आत असते ८९ / तरंग अंतरंग