पान:तरंग अंतरंग.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कल्पना केली, तरी एकमेकांकडे पाहायची नजर नक्कीच हीन पातळीवर उतरणार. याचाच अर्थ हा विषय दृष्टीचा नसून मानसशास्त्राचा असला पाहिजे. नुसत्या मनातील विचारांप्रमाणे नजर बदलते, असं दिसतं. म्हणजे मन दरिद्री न ठेवता 'श्रीमंत' केलं पाहिजे. मोठं केलं पाहिजे. मनाला असलेली ही लवचिकता मला फार भावते. कधी मन मुंगीएवढं करा वा साऱ्या मानवजातींनं फेकलेली घाण घेऊन येणाऱ्या नद्यांच्या 'माहेरपणा'चा जागर करणाऱ्या महासागराएवढं, अगदी अनिर्बंध; मग दरिद्रीपणा कशाला ? परवाच वाचण्यात आलं, मुलांनी मुलीकडे वाईट नजरेनं बघण्यामुळं दोन समाजात नुसत्या बोलाचालीवरून काठ्या व नंतर तलवारींपर्यंत प्रकरण पुढं गेलं; म्हणजे नजरेची धार तलवारीच्या धारेवर पाजळली गेली. रस्त्यावर एखाद्याला काळानिळा होईपर्यंत मारताना किंवा एकाकी दुर्बल स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावेळी आपण बघे असतो, तेव्हा हीच नजर तशी बोथट, थंड, निर्लज्जही होते. 'जाऊ दे, आपण कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडा,' असा लगेच पटणारा सल्लाही, आपलं मन देतं आणि नजर परकी पण होते. नजरेचे किती प्रकार हे ! म्हणजे ‘नीट बघा' म्हणून सांगणारी ती टीव्ही सुंदरी बरोबरच सांगत होती तर ... उगीचच मनात आलं, आपल्या लाडक्या शिवरायांचा वारसा सांगणारे आपण 'मी मराठी' असं अभिमानानं म्हणवून घेता आपण कधीतरी पूज्य शिवरायांनी ज्या नजरेनं, ज्या वात्सल्याने कल्याणच्या सुभेदाराच्या अप्सरेसारख्या सुंदर दिसणाऱ्या सुनेकडे पाहिलं, त्या आईकडे पाहायच्या नजरेनं पाहायला शिकणार आहोत का आपण. तसं घडलं तर त्यांच्या उभ्या कारकिर्दीत कधीही, कुणीही, कुणालाही न दिलेला 'नजराणा' मिळाल्याचा आनंद त्यांना होऊन आजही स्वर्गात धन्य-धन्य झाल्यासारखं वाटेल. तीच त्यांची खरी पूजा, एवढं निश्चित ! ܀܀܀ तरंग अंतरंग / ८८