पान:तरंग अंतरंग.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नजराणा पहात राहावे, चक्रावून जावे. असे देखावे फक्त निसर्गातच असतात. असे तुम्हाला वाटत असेल, तर 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणजे हे 'एबीपी माझा'चे बोधवाक्य. 'त्या' टीव्ही सुंदरीने 'बघा नीट' म्हटलं की, मला उगीचच चष्म्याच्या काचा पुसाव्याशा वाटतात. बाकी काही नाही. पण एवढं करून, काचा पुसूनही काय 'बघा नीट', म्हणते कुणास ठाऊक! उगीचच डॉक्टरकडं जाऊन डोळे तपासवेत की काय, अशी एक भुणभुण मनात राहते. असो. पण काहीही म्हणा, पुन्हा-पुन्हा 'बघा नीट' हे प्रकरण जरा गंभीर आहे, हे मनावर ठसत गेलं. नीट बघणं किंवा नुसतं बघणं किंवा नुसती नजर टाकणे असे किती असंख्य प्रकार आहेत..... आणि त्यामुळं काहीही घडू शकतं. हे मनात पक्क रुजलं. एका मस्त, गोबऱ्या गालाच्या चार-पाच वर्षांच्या मुलीकडे जरा गमतीनं डोळे वटारून बघितलं तर 'त्या' ढमीनं तो माझ्याकडे कसा बघतो बघ, अशी तक्रार तेवढ्याच गोबऱ्या गालाच्या आईकडं केली. मग पटकन् उचलून घेऊन लेकीच्या गोबऱ्या गालाची मस्त पापी घेऊन, तिच्या हातात 'कॅडबरी' ठेवल्यावर त्या ढमीनं आपलं इवलंसं बोट दुसऱ्या गालावर ठेवून, मान 'बालगंधर्वां' सारखी लाडिकपणे किंचित तिरकी करून, दुसराही गाल पुढं केला. आईला 'अमृताची चव' देत 'आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणजे काय ते शिकवलं. देवळात गेल्यावर कृष्ण आपल्याकडं कृपाळू नजरेनं पाहतोय, असं वाटून आपले डोळे भरून येतात. मग ती मूर्ती राहत नाही; तर प्रत्यक्ष तो विश्वात्मक देव होतो. ज्या नजरेनं कृष्ण अर्जुनाकडं पाहून त्याला समजावत होता, त्याच नजरेनं आपल्यालाही चार शहाणपणाच्या गोष्टी समजावतोय, असे वाटून सारी करुणा डोळ्यात भरून येते. ही कृष्णाची नजर म्हणजे अडचणीत, दुःखात असलेल्या पोटच्या पोराकडं. मग ते पोर साठ वर्षांचं का असेना. रस्त्यावरून मस्त गप्पा मारत, हसत खिदळत जाणाऱ्या मुली समोरून येणाऱ्या मुलांची जाणीव होताच गंभीर का व्हाव्यात ? त्या मुलांच्या नजरेत काय असेल ? एखाद्या माजोरी भुंग्यानं नुकत्याच उमलू पाहणाऱ्या फुलाकडं झेप घेतल्यावर पाकळ्या मिटून पुन्हा त्याची कळी व्हावी, असा हा प्रकार वाटतो मला. का त्यांचं निष्पाप हसणं, खिदळणं असं एकदम मिटून जावं ? याला निसर्गाचा नियम म्हणून गप्प बसण्याएवढी साधी गोष्ट आहे का ही ? का, कुठल्या गोष्टीकडे कसं बघावं, याचंही शास्त्र आहे. तसं असेल तर तेही बालपणापासून शिकवलं गेलं पाहिजे. वास्तविक, एवढंच मनापासून वाटलं पाहिजे की, त्या मस्त मजेत चाललेल्या पोरी आपल्याच घरातल्या आहेत. अरे, म्हणजेच 'महाउपनिषदां'त हजारो वर्षांपूर्वी मांडलेली 'वसुधैव कुटुंबकम्' ही शिकवण की काय? व्वा..! सारं विश्व हे एक कुटुंब, अशी अगदी मनापासून नुसती ८७ / तरंग अंतरंग