पान:तरंग अंतरंग.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फारच गुंतागुंतीचा, मेंदूशी संबंधित आजार असूनही अजूनही औषधोपचार सापडलेला नाही. साठ-सत्तर टक्के लोकांमध्ये अनुवंशिकतेमुळे हा आजार होतो म्हणे. सुडोकू, कोडी सोडवणे वगैरे मेंदूचे व्यायाम यासाठी करणे चांगले, पण याने आजार वाढत नाही एवढेच. मेंदूमध्ये स्मरणकप्पे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे असतात ही अजब गोष्ट आहे. उदा. आपण बटाटेवड्याचा विचार जरी केला तरी आपल्या डोळ्यासमोर त्याचा आकार, रंग, बरोबरच्या तळलेल्या मिरच्या हा दृश्य भाग उभा रहातो. ते काम नजरेच्या स्मरणकप्प्यातून येते, तर गरम स्पर्श मनात उभा रहातो तो स्पर्शेद्रियामुळे ! बनवण्याची म्हणजे तळण्याची, पातळ बेसन पीठात उकडून कुस्करलेला बटाट्याचा गोळा बुडवायची क्रिया वेगळ्याच स्मरणकप्प्यात. थोडक्यात फोडणी करायची तर पंचपाळ्यातील प्रत्येक डब्यातली एकेक वस्तू एकत्र करून फोडणी होते तसे या प्रत्येक कप्प्यातून मेमरी घेऊन आपल्या मनात बटाटेवडा उभा रहातो. आणि वडा खमंग असतो असा विचार केला तर घाणेंद्रियाच्या स्मरणकप्प्यातून सुवास घेतला जातो. म्हातारपणी या पेट्यातील स्मरणकण एकत्र करण्याची साखळी तुटते. आता सूक्ष्म तपासणीतून एवढेच कळले आहे की अमायलीन नावाचे प्रथिन त्या साखळीत जमा होते आणि त्यामुळे त्या वयात संपूर्ण खमंग बटाटेवडा आठवत नाही. बाप रे! एवढी गुंतागुंत असूनही लॉंग मेमरी बऱ्यापैकी शाबूत असते. बहुदा अनेक वर्षे आठवणी घासल्याने तसे होत असावे. असो. तर आमच्या या हतबल मित्राने आणि त्याहूनही हतबल त्याचे अगदी जीवश्चकंठश्च लंगोटीयार, त्याच्यासाठी जीव टाकणारे रक्ताचे नातेवाईक यांनी आता काय करावे हे तुम्ही कुणी सुचवू शकाल काय? घराबाहेर पडल्यावर घराचा ठावठिकाणा विसरल्याने दिशाहीन, वस्त्रहीन अवस्थेत गेलेल्या लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाणारे हातभागी आपण जेव्हा पाहाल तेव्हा यावर उपाय सुचवण्यामागची तीव्रता तुमच्या लक्षात येईल. तूर्त मी आपला रोज झोपताना ईश्वराला जड अंतःकरणाने, हृदयापासून फक्त प्रार्थना करतो, 'देवा, हा इश्यू जरा टॉप प्रायोरिटीवर घे बाबा!' ܀܀܀ तरंग अंतरंग / ८६