पान:तरंग अंतरंग.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि मी नकळत हात जोडले. साधंच गरम जेवण ; पण प्रेमानं तृप्त करणारं. जागोजागी ही व्यवस्था होती. भूक लागली की कुठंही जा. मला मात्र पृथ्वीवरचे दृश्य आठवू लागले. देवळापुढं, लग्नमंडपाच्या मागं उष्टी- खरकटी टाकायच्या जागेवर, स्टेशनवर कुठं कुठं उघडी नागडी भुकेली पोरं, केसांचे गुंते होऊन डोकं खाजवणारी माणसं आठवू लागली. फाटक्या परकरात लाज झाकणाऱ्या पोरी, जख्ख म्हातारे-म्हाताऱ्या डोळ्यापुढं केविलवाण्या नजरेनं उष्टं मागताना दिसल्या. आपण आपल्याला अजून 'माणूस' म्हणवून घेतो, याचीच शरम वाटली. मान खाली घालून मी चालतच राहिलो. सोन्यासारखा मानवाच्या जन्माला येऊन काय करून ठेवलं हे आपण ! साध्या घासभर तुकड्यासाठी बाकीच्यांना निर्लज्जपणे तोंड वेंगाडायला लावतो आपण. खिन्न - खिन्न झालो. असंच चालत चालत थेट एका सभागृहात पोचलो. एकापेक्षा एक दैदिप्यमान महान, तेजस्वी पुरुष - स्त्रिया तिथं आरामात बसले होते. मी वाकून नमस्कार करायला गेलो, तर कुणीही वाकू दिलं नाही. काय गजब वातावरण! मी म्हटलं, "देवांनो मी आज धन्य झालो. " सगळेच एकमेकांच्या चेहऱ्याकडं पाहायला लागले. बाबा, इथं कुणी देव नाही, कोणी दानव नाही. तसं काही असायची गरजही नाही. आम्हामध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. कुणीही कुठलंही काम आपल्या आवडीप्रमाणं करतं; कुणी जेवणाची, तर कुणी पाणी वाटण्याची काम करतो. सगळे सुखा-समाधानात आहेत ना, इतकंच पाहतो. इथं जात नाही; धर्म म्हणशील तर सर्वांना सुखी-समाधानी ठेवणं हाच धर्म. आम्हाला स्वतःचं असं घर वगैरे लागतच नाही. मला चक्कर यायचीच बाकी होती. मी जाऊन पारावर बसलो. 'त्या' डेरेदार वृक्षाच्या शांत छायेत, मला माझीही जन्माची हरवलेली शांतता क्षणात लाभली. मी शांत डोळे मिटून पद्मासनात बसलो. किती वेळ गेला, काही कळलं नाही. परवाच एक माकड दुःखानं आर्त चेहऱ्यानं पोटाचा खळगा झालेल्या म्हाताऱ्या, बेसहारा आजीच्या खांद्यावर हात ठेवून तिचं बरं-वाईट विचारत असल्याचा फोटो 'व्हॉट्सअॅप'वर पाहिला होता. मग, मी मानव का ते माकड मानव ? मी माझी जबाबदारी स्वार्थापोटी, सारं सारं ओरबडायच्या हव्यासापोटी माणसाचं जनावरही होऊ शकलो नाही की रे परमेश्वरा ? मनात निश्चय करून उठलो. वळून झाडाकडं पाहिलं, भगवान बुद्ध माझ्याकडे पाहून गालातल्या गालात स्मित करत होते. मी चक्क 'बोधिवृक्षा' खाली बसलो होतो . बुद्धदेवाची क्षमा मागितली आणि पाय पारावरून खाली सोडले. तर.... गार टाईल्सच्या स्पर्शाने खडबडून जागा झालो. हसलो. मनात आलं, असलं सारं फक्त स्वप्नातच रे बाबा.... फक्त स्वप्नातच.... ८१ / तरंग अंतरंग