पान:तरंग अंतरंग.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वीपेक्षा दुप्पट चेवाने चावते. त्यांच्या लेखी मी जणू बकासुरच झालोय की काय ? रोज एकजण आपल्या समाजावर झालेल्या अन्यायासाठी आपला जीव धोक्यात घालायला जणू तयारच असावी, हौतात्म्य पत्करायला. मला मात्र ही बकासुरी कल्पना असह्य वाटून गेली. लाजवून गेली... मलाच. माझ्या चुकीचा मला पश्चात्ताप झालाय हे त्यांना कसं कळवायचं... मला काही कळेना.... मग मी त्यांची ती शिक्षा मला मान्य असल्याचं त्यांना कळावं यासाठी रोज एक प्रयोग करू लागलो. मला चावायला येणाऱ्या मुंगीला मी अगदी सावकाश हळुवारपणे बाजूला घेऊन जमिनीवर सोडून देऊ लागलो. मला खात्री आहे, पुन्हा कधीतरी सार्वमतानं ठराव करतील त्या, "जाऊ दे अजून माणुसकी शिल्लक आहे, तोवर याला माफ करू या.' मी 'त्या' दिवसाची वाट पाहतो आहे. ७९ / तरंग अंतरंग