पान:तरंग अंतरंग.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुंगीपुराण वास्तविक, मुंगी या किटकाबद्दल मला कमालीचा आदर आहे. त्यांची एका ओळीत चालण्याची शिस्त, एकमेकांसमोरून आल्या तर जीवश्च कंठश्च मित्रांगत अगदी डोळे भरून चेहरा पाहत 'हाय, हॅलो' केल्याशिवाय न जाणं. सारंच मनमोहक ! तुम्ही सारं काम सोडून पाहतच राहणार. समजा, एखादी मुंगी तिला न झेपणारा खाऊ मारून मुटकून ओढून नेत असेल, तर दूरवर रांगेत जाणाऱ्या चार मुंग्या लगेच तिच्या मदतीला जातील. चार कोपऱ्यात चार व एक पुढं वाटाडी. थकलेली मुंगी लगेच सगळं प्रेम डोळ्यांत भरून म्हणणारच, "बरं झालं बाई तुम्ही आलात, मला घाम फुटला गं एकटीला. मला वाटलं, तुम्हाला मी दिसते की नाही." "न कसं दिसेल ? एक मैलावरच तर होतीस." असं संभाषण त्यांच्यात नक्की होत असणार. माझ्या लक्षात आलं, आपलं चार-पाच फुटाचं अंतर मुंगीला मैलभर वाटणारच. त्यांच्या संभाषणाची मला गंमत वाटली. हीच परिस्थिती सामान उचलणारी एक बाई आणि अगदी जवळून जाणाऱ्या चार बाया असत्या तर... 'मरू दे तिकडं. एवढं न पेलणारं उचलायला सांगितलं होतं कुणी भवानीला ? आम्ही नाही थोडीशीच वैरण आणली. सासूला दाखवून मिरवायचं असेल, बघा बाकीच्या बायकापेक्षा मी किती जास्त वैरण आणली. " - दुसरी लगेच "होय." सासू पण लगेच म्हणत असेल, "दमली गो बाय माझी. बस चा टाकतो. नाही तर आमची ढोली, नुसती बसून म्हशीसारखी चरती." आता वैरण टाकल्याचा आवाज आला की लगेच म्हणेल बघ, "सूनबाई चा टाकतीस नव्हं?" घाम पण पुसू देणार न्हाय. पण 'त्या' दिवशी दुपारी जेवून जरा झोपलो, तो मानेला मुंगीच्या करकचून चावण्यामुळं जागा झालो. उशी उचलून बघतो, तर वारूळ फुटल्यागत सगळी धावाधाव. मी एका सेकंदात रागारागानं साऱ्या मुंग्यांचं कतलेआम करून टाकलं. नंतर जरा वाईटच वाटलं. एकेका मुंगीचं वजन एक-दोन मिलिग्रॅम; माझं सत्तर किलो. बहोत नाइंसाफी ! काय अधिकार आहे मला सगळ्या मुंग्या मारायचा ? मी एक श्रेष्ठ मानव. आम्ही दुसऱ्या मानवाची मुंडी कापायला क्षणभर सुद्धा वेळ फुकट घालवत नाही, तर या क्षुद्र मुंगीच्या जीवाची काय कथा! अरे, माझं मन ' टेररिस्ट' झालं की काय ? मुंगीला पण जीव आहे ना ? हजारो मुंग्या राब-राब राबतात, पावसाळ्याची बेजमी करायला. सगळ्या मिळून सगळ्यांसाठी; ते सुद्धा आम्ही टाकलेले अन्नकण, मेलेले किडे गोळा करुन, अरेरे...! म्हणजे आमचीच सेवा की. एक चावरी मुंगी सोडून साऱ्या मुंग्याची मनोमन क्षमा मागून मी आपल्या कामाला लागलो. पण बाकी साऱ्या मुंग्यांनी एक सभा घेऊन वेगळाच ठराव केल्याचं मला नंतर कळलं. रोज दुपारी संपूर्ण गादी झटकूनही एक मुंगी, माझे सारे पहारे चुकवून येते, मानेला तरंग अंतरंग / ७८