पान:तरंग अंतरंग.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आज त्याच्या 'उद्योगा'ला मंदी आली असावी. आरामात कोचावर बसत म्हणाला, "बोल, मी तुला माझ्या अखत्यारित, तुझ्या इच्छेच्या शुद्धतेचा विचार करून एक संधी देईन. ' 'यमदेवा, माझे आई-वडील हे माझे दैवत ज्या बावनकशी शुद्धतेने त्यांनी मला ज्या दिवशी या जगात आणले, त्याच शुद्ध आत्म्याच्या स्थितीत मी तुझी सोबत आपल्या शेवटच्या प्रवासात करावी, एवढीच माझी तीव्र इच्छा आहे. त्यांचे आणि माझ्यावर संस्कार करणाऱ्या तमाम पालकांचे आत्मे अजून 'त्या' माझ्या आत्मशुद्धीसाठी मुक्त झाले नसणार तेव्हा एवढी सफाई करण्याची परवानगी मिळावी म्हणून ही कळकळीची विनंती. " यमराज जोरात हसले, "अशी लई माणसे मला फसवायला बघतात. तुझं जगून संपलंय, आता कसली आणि केव्हा सफाई करणार रे तू ?" "हे यमराजा, आपला प्रश्न अगदी बरोबर आहे; पण ईश्वरानेही तारीख अगोदर कुठं सांगितली होती? शिवाय, बघ, अजून मी धट्टाकट्टा आहे. तेव्हा मला आजच माझा नंबर लगेच लावाल, असे वाटले नाही, आणि हो. तुम्ही मला माझ्या इच्छेची शुद्धता पडताळून संधी देणार म्हणाला होतात. तेव्हा आपण वचन पाळणारच याची मी खात्री बाळगतो." आता मात्र यमदेवांनी अगोदर डाव्या पायावर उजव्या पायाची बैठक होती, ती बदलून डावा पाय उजव्या पायावर ठेवला. मी हळूच गालातल्या गालात हसलो. "का रे, हसलास बरा ! मला बघूनही हसणारा तू पहिलाच माणूस" (मी मनात म्हटले, 'चला, मला हे माणूस म्हणताहेत, हेही नसे थोडके.) मी म्हणालो, "आपण हा 'पवित्र' प्रवास, उजवा पाय पुढं टाकूनच करत असणार, याची मला खात्री होती. तेव्हा उजवा पाय वरच असला पाहिजे, नाही का ?" आता मात्र यमराज गडगडून हसले. "तथास्तु! पण लक्षात ठेव, ती तुझ्या जन्माच्या वेळची शुद्धता येण्यास किती वेळ लागू शकतो, हे आम्हाला, तुम्ही येता- जाता ज्यांच्या पायावर डोके ठेवता, त्या साधू-संतानी पटवून दिले आहे." यमदेवाला अशी 'डिस्क्रिशनरी पॉवर' असणार, याची खात्री सत्यवान आणि सावित्रीमुळे होतीच. माझे नशीब खरोखरच सॉलिडच म्हणायला हवे. कारण... 'त्या' दिवशी पौर्णिमा होती आजही वटपौर्णिमा होती. माझ्याच हुशारीवर बेहद्द खूष होऊन मी आता कामाला लागलोय. मग शेजारी 'एकच घोट' वाला दोस्त बसला असला तरी चला. बास करतो. मनाला गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत पडलेल्या गाठींचं गाठोडं मोकळं करायचंय. सगळीच सफाई बाकी आहे. क्षमा मागणं, क्षमा करणं. उगा कुणा-कुणाला दुखवलं त्यावर फुंकर घालणं वगैरे वगैरे.... तरंग अंतरंग / ७६