पान:तरंग अंतरंग.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मन विचार-विचार येत नाही भानावर किती आवरा-आवरा छोट्या छोट्या गोष्टी सुसाट काहूर वान्यावर..... काही लिहायचे ठरवून लिहिता येतच नाही. लिहिणं म्हणजे तरी काय ? अफाट अस्ताव्यस्त, नुसता गोंधळ घालणारे शब्दांचे वादळ. क्वचितच शांत होणारे. किमान घोंगवणारे तरी खरेच. कधी नव्हे ते, अध्यात्म-अध्यात्म म्हणतात ते काय ते बघुया, असाही एक विचार सारखा मनाला बोचू लागला. अनेकांना माहीत असलेल्या या अध्यात्माचा आपल्याला मागमूसही असू नये ? भल्या पहाटे खरं तर 'राम प्रहरी'च याचा शोध घ्यावंसं वाटलं. मग कळलं, तो रात्री अडीच वाजता सुरू होतो. खरं-खोटं कोण जाणे; शिवाय उगाच पोलिसांनी काठी आडवी घातली, तर कोठडीतलं 'अध्यात्म' काही परवडणारं नाही. सरळ एक गुरू महाराज गाठायचे ठरवले आणि बाहेर पडलो. जुन्या वाड्यासमोर दाखल झालो. इतक्या पहाटे पण अंगणात सारवण करून सुरेख रांगोळी काढली होती. तुळशीच्या इवल्याशा कोनाड्यात स्वच्छ घासलेलं पितळेचं निरांजन उगवत्या सूर्यासारखा छान उबदार प्रकाश पेरत होतं. हात जोडून त्या तुळशीमाईला आणि इतकं देखणं स्वागतोत्सुक अंगण मांडणाऱ्या 'त्या' अदृश्य गृहदेवतेला डोळे मिटून नमस्कार करून मनापासून शुभचिंतन केलं आणि हलकेच उघड्या दारावरची कडी वाजवली. "बघा दारी कोण आलंय." हा आवाज घरधन्याचाच असावा. थोडा धीरगंभीर वाटला. "इतक्या सकाळी कोण आलं असेल बाई,” असं म्हणत एक सुस्नात, अत्यंत आकर्षक, हसतमुख आणि मायाळू चेहरा दाखल झाला. "शास्त्री आहेत का ?" "हो आहेत, या ना आत. " शास्त्रींच्या समोर एक पाट मांडून मला बसायला सांगितलं आणि स्वारी आत निघून गेली. ‘’बसा. काय काढलंय आज ? तुमच्या शास्त्राचा आधार असल्याशिवाय काहीही न मानणारे डॉक्टर, तुम्ही, इकडं कुठं वाट चुकलात ?" अत्यंत नम्रतेने पाटाकडे हात दाखवत शास्त्री म्हणाले, "बसा, बसा. " "तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं मी?" "छे हो. उलट डॉक्टरांनी पेशंट न बोलावता येणं हेच अप्रुपाईचं." मोठ्यानं हसत शास्त्रीबुवा म्हणाले. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक. रुंद कपाळ. त्यावरचे तीन रेखीव भस्माचे पट्टे. कमावलेली शरीरयष्टी. चेहऱ्यावर अत्यंत समाधानी स्मितहास्य. तरंग अंतरंग / ७०