पान:तरंग अंतरंग.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझी उमेदवारी दुपारच्या वेळी दारावर टकटक झाली. बाहेरची कुजबुज ऐकून मी जरा सावधगिरी बाळगूनच दार उघडलं. उत्साही, तरतरीत तरुण-तरुणींचा जथ्थाच दारात उभा होता. "कोण हवंय ?" "तुम्हीच आजोबा." बाहेरच्या जथ्थ्यानं एका सुरात माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. या वयात या तरुण भारतीयांनी माझ्यासारख्या पंचाहत्तरी पार पडलेल्या; पण उत्साही (घरचे यालाच 'अतिउत्साही' असेही म्हणतात ) म्हाताऱ्याकडे काही काम काढलंय, हे ऐकूनच उत्साह द्विगुणित झाला. वय निम्म्यावर येऊन चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पण अर्ध्या झाल्याचा उगीचच समज झाला. अत्यंत हसतमुखाने सर्वांचे स्वागत करून त्यांना स्थानापन्न केले. जिना चढून ( लिफ्ट असतानाही) आल्यामुळे चेहऱ्यावरचा घाम पुसेपर्यंत फ्रीजमधले गार तयार सरबताचे ग्लास भरलेला ट्रे मी घेऊन आलेला पाहून सारी मंडळी गहिवरली. का कुणास ठाऊक, अशी उत्साही, जिद्दी तरुण पिढी पाहिली की मलाही उगीचच भरून येतं. अनिष्ट रूढी, परंपरांविरुद्ध बंडाचा झेंडा घेऊनच सदैव, कधी - कधी तर एकाकी पण लढत असतात ही तरुण मंडळी. "असो. मंडळी माझ्याकडे काय काम काढलंय, वर्गणी वगैरे हवी..." "नाही, आम्ही एका गंभीर बाबीबद्दल तुम्हाला साकडं घालायला आलो आहोत." माझा प्रश्न पुरा होण्याआधीच उत्तर आलं. मनात नातवानं कॉलेजमध्ये काही गोंधळ घातला की काय, अशी शंका येऊन त्या भीतीने थोडा सावरून बसलो. "तुम्ही या आपल्या वॉर्डातून निवडणुकीला उभं राहावं, अशी गळ घालायला आलो आहोत. " युवा मंडळाने माझ्यावर बॉम्बच टाकला. "अरे, माझं वय माहीत आहे ना ?" मी त्यांना विचारलं. "तुमचे रोजचे टाईम टेबल पाठ आहे आम्हाला आजोबा. त्यात कधीही एक मिनिटाचाही बदल झालेला पहिला नाही आम्ही." मंडळी पूर्ण अभ्यास करुन आलेली वाटत होती. - आता मात्र मी हादरलो; पण कौतुक ऐकायला वयाचा काही संबंध असतो का ? मला कुतुहल वाटत होतं म्हणून त्यांना विचारलं, "तुम्ही मला का निवडलं ? " "तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गँगच्या रोजच्या कट्ट्यावरच्या आपलं शहर स्वच्छ, सुसंस्कृत कसे होईल, याबद्दलच्या गप्पा आम्ही ऐकतो. त्यावरून आमची खात्री झाली की, तुम्हीच योग्य आहात या निवडणुकीत उभारण्यासाठी निवडून आणण्याची जबाबदारी आमची." मंडळी सगळे ठरवूनच आल्यासारखं माझ्या प्रत्येक शंकेला उत्तरं देत होती. - "बरं..." माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच सगळ्यांनी एकदम भान विसरून जोरजोरात ओरडत उंच-उंच हात करून टाळ्या देऊन त्याही डान्सच्या स्टाईलवर एकमेकांना मिठ्याही मारून झाल्या. शेवटी सगळ्यांना कसाबसा थांबवून म्हणालो, "दोस्तांनो थांबा अगोदर, माझ्या काही अटी सांगतो..... तरंग अंतरंग / ६८