Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भदराज साधारण १९७५ साल संपत आलेलं. अतिउत्साहानं डेहराडून मिलिटरी अॅकॅडमीत प्रवेश घेतला, ग्रॅज्युएट जंटलमन कॅडेट म्हणून व्वा, हुद्दा तर एकदम भारी, जंटलमन कॅडेट! हळूहळू कळलं, कुठल्याही बाजूनं आम्हाला 'जंटलमन' म्हणून ट्रीट करायची कुणाचीही इच्छा किंवा तयारी नव्हती. माझ्या कॅनडातून आलेल्या काकांनी त्यांचा उंची उलन लाँग कोट, माझ्या ॲकॅडमीतल्या निवडीबद्दल कौतुकानं दिलेला. सकाळच्या खरपूस परेडच्या वेळी झालेल्या किरकोळ चुकीबद्दल खडकाळ मैदानात तो उंची कोट घालून पाठीवर पार फाटून चिंध्या होईपर्यंत कोलांट्या उड्या मारायची शिक्षा झाली. नंतर काकांच्या पुढे कोट फाटल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. म्हणाले, "अरे, असल्या एका कोटाचं काय घेऊन बसलास ? असले छप्पन कोट भारतीय आर्मीतल्या तुमच्यासारख्या बेदरकार आर्मी ऑफिसरवरून ओवाळून टाकीन." मनाला वाटलेली लाज केव्हाच गायब झाली. 'त्या' रुबाबदार सैन्यातील आपली पायरी दाखवणाऱ्या छातीवरच्या रंगीत फितीचा युनिफॉर्म घालून, निळ्याशार अफाट आभाळाखाली चांदण्या रात्रीला भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करून उभी असलेली माझी तुकडी आणि सर्वांत पुढे आमच्या भरवशावर निर्धास्त झोपी गेलेल्या साऱ्या भारतीय नागरिकांना मनोमन आश्वस्त करत अत्यंत सावधपणे पोलादी पुतळ्यासारखा उभा ठाकलेला मी. भयाण एकाकी शांततेत, सोबतीला रायगडाच्या तटासारखा शंभर हत्तीच्या बळानं कणखर झालेला आपल्या साथीदारांच्यावरचा विश्वास आणि दूरवरच्या एखाद्या कोपऱ्यात डोळ्यांत प्राण आणून सदैव परमेश्वराला आळवणारे माझे दादा, आई, भाऊ आणि अनेक सगे सोयरे. माझ्याबद्दल अतूट अभिमान बाळगणारे माझे असंख्य शाळासोबती आणि माझे देशवासी हे सारं सारं मला स्वच्छ दिसत होतं. .. आणि माझे पाय अधिकच घट्टपणे माझ्या भारतभूमीवर एक-एक इंच जागेच्या रक्षणासाठी कणखरपणे रुतत होते. शिक्षा तर रोज सगळ्यांना व्हायचीच; आणि कसली शिक्षा म्हणाल तर, "ये जा, नेकलेस पा के आ.." म्हणजे गळ्यात सायकल अडकवून आणायची. मान दुखेपर्यंत बराच वेळ उन्हात उभं राहिल्यावर मग अख्ख्या बराकीभोवती चकरा मारत राहायचं. घामानं भिजत, कधी पायडल तर कधी हँडल पाठीत रुतत, तर कधी ब्रेक छातीत घुसत. खूप दुखायचं; पण औषध म्हणाल, तर सकाळ, दुपार, संध्याकाळ एक-एक गोळी, देशाच्या संरक्षणाची. कपाळावरच्या घामाबरोबर गिळायची. कुठं दुखत होतं, हेही सांगता यायचं नाही. एखाद्या रात्री कधी जरा कुठं आरामात उभं पाहिलं की, "बेटा, इधर आ खड़ा रह जा। देख, सारी बत्ती दिखती है ना।" आम्हाला वाटायचं, ती मसुरीची सुंदर लायटिंग तरंग अंतरंग / ६६