Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पसरलेले होते. माझे हात-पाय आणि सारे शरीर चाचपडून मी जिवंत असल्याची खात्री करून घेतच होतो. तेवढ्यात बाजूच्या कोचाकडे हाताने इशारा करत घर आपलंच (खरं म्हणजे आपल्या बापाचं असल्यासारखं म्हणणार होतो; पण मनात आलं, यमाशी पंगा, महागात पडू शकेल.) असल्यासारखं जड आवाजात मला म्हणाले, "बसा मालक." मी अगोदरच पोटात आलेला गोळा दाबून थोडा थरथरतच बसलो; मला वाटत असलेली भीती न दाखवता म्हणालो, "आज इकडं कुणीकडं? कुणाचा पत्ता विचारायला आलाय काय ?" नाही म्हटलं, "बाजूच्या चिंचोळ्या गल्लीतल्या शेवटची घटका मोजणाऱ्या परांजपे पणजोबांकडे आलात काय, चला दाखवतो." मी उगीच 'चहा वगैरे घेणार काय हे, ' न विचारता बला टळावी म्हणून गडबडीने उठत होतो; तर यमदेवाने चिमटीत माझा शर्ट पकडून दण्णकरून मला परत कोचात बसवून म्हणाले. आपल्याकडेच आलो होतो. ('आपल्याकडेच ' म्हटलेलं ऐकून यमराजाबद्दल माझा आदर द्विगुणित झाला हो.) घरातून कुणीतरी चपळाईने दोन मोठ्ठे तांबे, भांडी भरून पाणी आणले, म्हणून बरं झालं. यमराज पाणी पिऊ दे, नाही तर राहू दे, मी सरळ तांब्या तोंडाला लावला आणि गटागटा संपवला. इतका वेळ विसरलेला नमस्कार अगदी वाकून केला. .. आणि घोगऱ्या आवाजात यमराजांना म्हणालो, "बोला, काय काम काढलं. " यावर यमराज म्हणाले, “काम नेहमीचंच; पण पूर्वीसारखी मजा नाही राहिली. "ऑ..! म्हणजे पूर्वी या कामात मजा यायची तुम्हाला ?" "हो. अहो, बहुतेक सगळी मंडळी स्वच्छ, सत्शील, प्रामाणिक, सात्विक आहार करणारी, पापभिरू असत. हवा शुद्ध, पोल्युशन फ्री होती. पूर्वी कधी 'कोरोना'चं नाव तरी ऐकलं होतं का ?" मी आता मात्र ऐसपैस, आरामात बसलो. "काहीही खातात, पितात, कुठंही घाण करतात. आमचं काम किती वाढतं ? आत्मा, शरीर कसं शुद्ध, स्वच्छ असावं." "बरोबर आहे तुमचं." मी माझा नैतिक पाठिंबा जाहीर करून मोकळा झालो. यमराज म्हणाले, “रेडा दमलाय जरा. चारा-पाणी खाऊ दे आणि मग लागू कामाला. तुमच्या अंगणात पाणी भरलेला हौद दिसला, म्हणून थांबलो." आता मला एकदम तरतरी आली. म्हटलं, ‘‘रेड्याचं चारा-पाणी होईपर्यंत आपण काही चहा-पाणी..." यावर "आम्ही ड्यूटी संपल्याशिवाय काही खात - पित नाही," यमराज जरा डाफरतच म्हणाले. माझं व्यंग नाहीतरी थोडं बोचलं असावं. एवढ्यात रेड्यानं हंबरडा फोडला. यमराज उठले आणि धाडकन् दार बंद करत तडक बाहेर पडले. 'त्या' आवाजानं माझी तंद्री भंग पावली. ....आणि 'आत्मशुद्धी' करायच्या निश्चयानं 'गीता' वाचायला सुरुवात केली. बहुधा इतक्या डॉक्टरांनी म्हणूनच माझा कान धरला वाटतं. ६५ / तरंग अंतरंग