पान:तरंग अंतरंग.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्मशुद्धी एखाद्या दिवशी अवचित काय घडते, कळत नाही. नेहमीसारखाच दिवस होता. उठलो आणि नेत्रविशारदाकडे जाऊन रूटीन चेकअप करावा म्हणून गेलो. सांगलीत एक बरं आहे, समस्त डॉक्टर मंडळी अतिशय प्रेमभावाने, मैत्रीचा सल्ला देतात. तपासून झाल्यावर डॉक्टर म्हणाले, "दृष्टी छान आहे." वर म्हणाले, "नजर सुधारा." मी उडालोच ! दवाखान्यात आल्यापासून मी कुठे वाईट नजरेने पाहिल्याचे स्मरेना. माझी गंभीर चर्या पाहून म्हणाले, "अहो गंमत हो." त्याच विचारांच्या तंद्रीत बाहेर पडता पडता उंबऱ्यावर ठेच लागली. हल्ली चालताना डावा पाय थोडा आंधळ्यासारखा वागतो. म्हटलं, "आलोच आहोत तर समोरच्या कुटुंबमित्र अस्थितज्ज्ञाला भेट द्यावी." मी आत येताच त्याने माझं प्रेमभरानं स्वागत केलं. "या काका, कसे आहात ?" म्हटलं, "डावा पाय कुरकरतो आहे." त्यावर त्याने मला टेबलवर झोपवून टेबलावर आपटतात तसाच हातोडीने गुडघ्यावर ठोका दिला. पूर्ण ताकदीने गुडघ्यातून कपड्याची घडी घालावी तशी झटकून पायाच्या घडीची काढ-घाल केली. म्हणाले, "उठून बसा. हाडं तर वयाच्या मानाने सरळच आहेत. या वयात पाऊल वाकडं मात्र कुठं पडत नाही ना, याची काळजी घ्या." आणि खदखदून हसले. "च्या मारी. आज चाललंय काय." मला कळेचना. वाकड्या पावलाच्या नुसत्या विचारानं पोटात गोळाच आला. आतडी पिळवटल्यासारखी झाली. म्हटलं, 'अॅसिडिटी वाढली की काय एकदम.' तीव्र विचाराने पोटात अॅसिड एकदम बदादा पडतं म्हणे. आता मात्र मी जिद्दीलाच पेटलो. घरी जाण्यापूर्वी गॅस्ट्रॉलॉजिस्टला दाखवून खात्री करावी म्हणून ठरवून त्याच्याकडे गेलो. पूर्ण तपासणी झाल्यावर स्टेथेस्कोप गळ्यात अडकवत डॉक्टर म्हणाले, "पोटबीट स्वच्छ आहे, आता या वयात मन एकदम स्वच्छ ठेवा म्हणजे झाले." "ऑ..! अहो काय डॉक्टर ? आज काय समस्त डॉक्टर मंडळींना कुणी भेटलं नाय का ?" "का, असं का विचारताय काका ?" मग त्यांना माझ्या 'प्रभातफेरी'चे वर्णन करून आज पचवलेल्या सल्ल्यांच्या डोसाबद्दल सांगितले. यावर हसून डॉक्टर म्हणाले, "मन स्वच्छ ठेवा सांगितलं, ते उगीच गंमत म्हणून. सगळं ठणठणीत आहे. " तेथून बाहेर पडलो. पण डाव्या कोफ्यावरच्या अत्यंत जिगरी ओळख असलेल्या मानसोपचार तज्ज्ञांचा दवाखाना लागू नये, म्हणून अगोदरच्या गल्लीत जे घुसलो ते प्रचंड तंद्रीतच घरी पोहोचलो..... घराच्या दारात एक तुकतुकीत, नुकताच अंगदाढी केलेला रेडा मजेत गवत खात होता. त्याच्याकडे पहात हॉलमध्ये पाय ठेवला आणि थबकून उभाच राहिलो. आपला मुकुट बाजूच्या टी-पॉयवर ठेवून 'टाइम्स' वाचत चक्क यमराज माझ्या कोचावर ऐसपैस बसले होते! (बहुतेक आज किती मेले, ते 'टाइम्स'मध्ये वाचत असावेत.) बसले कसले; तरंग अंतरंग / ६४