पान:तरंग अंतरंग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ओढतच गुरुजींनी मला उभं केलं होतं! अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांना हे भयानक वाटेल पण भारतीय विद्यार्थी गणितात अव्वल असतात याच हेही एक गुप्त कारण ! तुझ्या या वाक्यांवर मोठ्याने हशा पिकलेला पाहिला! पुढे तू म्हणालास... माझ्या चुकलेल्या गणिताभोवती संपूर्ण पानभर लाल पेन्सिलीने ठळक शून्य काढले होते. सारा वर्ग हसत होता. मी मनातल्या मनात धुसपुसत होतो. त्यावेळी कुठून धाडस आलं, माहीत नाही. पण, बाकावर बसल्यावर ते ठळकपणे शून्य रंगवलेलं पान फाडून त्याचा कागदी बाण केला. गुरुजी फळ्यावर लिहीत असताना नेम धरून तो बाण मारणार, तोच नेहमी माझ्या बाकावर शेजारी बसणाऱ्या अभिजित जोशीने माझ्या हातून तो बाण हिसकावून घेतला. आयुष्यातली मोठ्ठी घोडचूक करण्यापासून मी बचावलो! अभिजित केळकर सरांचाच शिष्य. त्याने माझी चूक त्यांच्याच पद्धतीनं समजावून सांगितली ! पुढं आयुष्यात कधीही मी पहिला नंबर सोडला नाही. मला इथल्या सर्व शाळेतून गणित शिकवायला आवडेल. माझा रविवार कारणी लागेल आणि माझ्या या केळकर गुरूजींचे नाव होईल. तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद ! तुझ्या या भाषणानंतर ते प्रचंड सभागृह तेथील उपस्थितांच्या उभे राहून केलेल्या टाळ्यांच्या गजराने पाच मिनिटे दुमदुमत होते. ऋषी तुला हे सारं मी ईमेलवर पाठवू शकलो असतो, पण एका मोठ्या पाकिटात घालून हे पत्र पाठवत आहे. त्यांच्याबरोबर मी एखाद्या मोरपिसासारखा जपून ठेवलेला आणि तू घड्या घातलेला तो शुन्य मार्कांचा कागदी बाण पण पाठवत आहे. तुझाच, अभिजित जोशी ता. क. तुझ्या इंग्रजीतल्या भाषणाचा शब्द न शब्द मी मराठीत उतरवला आहे त्याची एक प्रत केळकर सरांना पण देऊन आलो आहे. सवडीने जरूर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोल! अरे एवढ्या म्हातारपणी पण त्यांना प्रत्येक मुलगा संपूर्ण नावासकट आठवतो. ६१ / तरंग अंतरंग