पान:तरंग अंतरंग.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मॅडम कधी तरी एखादा दिवस असा उगवतो की वाटते, आज मी बाहेर पडलेच नसते तर बरे झाले असते. काल असंच झालं, अत्यंत खाजगी कामासाठी बाहेर पडले तर अतिपाल्हाळ लावणारे, कमी ऐकू येणारे, उन्हं सहन न होणारे, वडिलांचे मित्र आपटे काका वाटेत भेटले. कितीही तोंड लपवले तरी त्यांनी हटकलेच. मी का, कशासाठी, कुठे निघाले, केव्हा परतणार वगैरे प्रश्नांची उत्तरे फक्त त्यांनाच ऐकू येतील, अशी देणे; आणि तेही भर रस्त्यात, हे म्हणजे एकदम चिडीचूप सिनेमागृहात शेजारच्या हि म्हातारबुवांना इंग्लिश नटाचं नाव त्याला कळेल, अशा शब्दांत सांगण्याएवढं कठीण होतं. हे जाणून मी त्यांना घेऊन सरळ उलट पावली परत घरी आले. आईला चहा करायला सांगून, वडिलांच्या खोलीत आपटे काकांना आसनस्थ केले. त्यानंतर " आलेच, " म्हणून सरळ सटकले. आता आधीच उशीर झालेला. चालत जाणे म्हणजे आज फुकट फेरी झाली असती. मग सरळ सर्रकन स्कूटर काढून नकोशा गर्दीत जरा जास्तच वेगात घुसले. पण अचानक खरखरमुंडेपणा करून मालकाला गल्लीत घुसायला सपशेल नकार देणाऱ्या टांगेवाल्याच्या घोड्यासारखी स्कूटर गचके देऊन थांबली. टाकी रिकामी. गप मुकाट्यानं स्कूटर हातात घेऊन पंपाच्या दिशेने शक्य तेवढी मान खाली घालून धापत चालू लागले. आज नेमक्या अनेक आवडत्या नावडत्या मैत्रिणींनी हटकले. त्यांना कटवत - कटवत, घाम पुसत पंप गाठला. अगोदरच लांबलेल्या शेपटीवरचा केस होऊन मीही उभी राहिले. मुंगीच्या गतीनं सरकणारी रांग; त्यात मध्येच तंबाखू चोळून हातावर हात आपटून जरा हात चाळणीसारखा हलवून वरचा गाळ झाडून खालचा ओठ चिमटीत धरून दुसऱ्या हाताच्या चिमटीत मस्त मळलेली तंबाखू अलगद गालाखाली सरकवणाऱ्या 'त्या' पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याराला मनातल्या मनात लाखोली वाहत मीही निमूटपणे त्या शेपटाचाच भाग बनून गेले. शेवटी एकदाचा नंबर लागला. तंबाखूची लाळ न गळेल एवढी मान वर करून उघड्या तोंडानं बोबड्या शब्दांत त्यानं विचारलं, "किती टाकू ?" या प्रश्नानं एकदम चक्करच आली. गडबडीत आपटे काकांना आसनस्थ करताना तिथल्या स्टुलावरच ठेवलेली पर्स तिथेच विसरल्याचे लक्षात आलं. “ओ मॅडम, सांगा की लवकर." तो कारागीर आपली लाळ आवरत गडबड करत म्हणाला. "मी पर्स विसरले." मी जरा चाचरतच त्याला म्हणाले. "व्हा मग लवकर बाजूला. आयला. गर्दीच्यावेळी नसती कचकच " असं खेकसत त्याने पिंक टाकली. तंबाखूची ती पिचकारी तो माझ्याच तोंडावर टाकतो की काय, असे वाटले. इतका राग आला; पण चूक माझी होती. त्यानं तंबाखू गिळली आणि मी मुकाट्यानं राग गिळला. तरंग अंतरंग / ५६