पान:तरंग अंतरंग.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"प्रिय वाश्या, सांजसावल्या परवा वाटेत रम्या भेटला. ओढून आपल्या कॉलेज जवळच्या टपरीवर घेऊन गेला. इतक्या वर्षांनी पण टपरीवाल्या गणपानं ओळखलं. न सांगताच एक कडक स्पेशल, अद्रक मारून चहा उकळायला टाकला आणि 'त्या' साऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. पहिली ते कॉलेजपर्यंतचा प्रवास एकत्र केलेले आपण पाच-सहाजणच आठवतात. रम्या डॉक्टर झाला. मीही बऱ्यापैकी मोठ्या कंपनीत वरच्या जागेवरून निवृत्त झालो. रम्याचा मुलगा, सून दोन्ही डॉक्टर आहेत. त्याचाच दवाखाना आणखी नावारुपाला आणत आहेत. गणपाला चहाचे मी पैसे द्यायला लागलो, " हीच ओळख ठेवली का?" म्हणाला. गणपानं तुझी पण आठवण काढली, तसा रम्या म्हणाला, "वाश्या, अमेरिकेतला प्रसिद्ध सर्जन आहे. 'राजवाड्या'त राहतोय बेटा." अर्थात, मला आश्चर्य वाटलं नाहीच. पहिला नंबर कधीही न सोडलेला तू, याच 'राजवाड्या'चा हक्कदार. तुझी ताई कुठं असते रे? आम्ही तुझ्या घरी आलो की, तिखट-मीठ लावलेली कैरीची फोड हातावर आणून ठेवायची. नुसत्या ताईच्या आठवणींनी जिभेवर 'त्या' फोडीची चव अजून सरसरून जागी होते. तुला बाळ्या इनामदार आठवतो ? काय अफलातून चित्रं काढायचा. वर्गातल्या सगळ्या मुला-मुलींची पाठमोरी चित्रं काढलेली कुणीही 'करेक्ट' ओळखत. घरची गरिबी; पण जागतिक दर्जाचा चित्रकार होण्याची स्वप्नं रंगवायचा. नुकताच गेला. मी त्याच्या घरी गेलो सांत्वन करायला. कोणीच नव्हतं रे तिथं. तीच जुनाट खोली, अंधारी. मीच खिडकी उघडली. त्याच्या खाटेखालची पत्र्याची बॅग उघडली तर बिचाऱ्यानं साऱ्या दोस्तांना एकाच चित्रात हुबेहूब चितारलं होतं आणि वरच्या कोपऱ्यात खूप उंचावर ढगातून आपल्याकडं किंचित हसत, पाहत भरल्या डोळ्यांनी हात हलवून आपला निरोप घेणारा स्वतः बाळ्या ! मी रात्रभर तळमळलो. बहुधा हे त्याचे शेवटचेच चित्र असावे. त्याची सारी चित्रं गोळा केली. आज माझ्या ऐसपैस दिवाणखान्याच्या भिंतीवरून आपलं सारं बालपण 'जिवंत' करतात, ती सारी चित्र. मी सोनेरी फ्रेम्समध्ये घट्ट बांधून ठेवली आहेत. का असं व्हावं ? तू अमेरिकेत एवढा मोठा यशस्वी सर्जन. रम्या असा मस्त चैनीत आहे. मीही सुखानं जगतोय, मग जगप्रसिद्ध चित्रकार होण्याचं स्वप्न रंगवणाऱ्या 'त्या' हाडाच्या कलाकाराचं असं का व्हावं? पण मनात मात्र सतत टोचत राहतं. शेवटपर्यंत सारे सवंगडी हृदयात इतके जपून ठेवणाऱ्या या बालमित्राचं बोट आपण सोडून त्याला नियतीच्या सोबतीला सोडून द्यायला नको होतं रे. मी आपला त्या साऱ्या आठवणींचा खजिना बाळगून जगतो आहे, तीच माझी संपत्ती. तुला पत्र मिळेल का माहीत नाही, तुझ्यासाठी तो भूतकाळ काय किमतीचा तरंग अंतरंग / ५४