पान:तरंग अंतरंग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरातरा चालायला लागले. त्या माऊलीनं दुरूनच त्यांना येताना पाहिलं आणि उत्साहानं उभी राहून ती सामान लगबगीनं एकत्र करू लागली. जवळ आल्यावर बाबांचा चेहरा पांढराफटक, भुतासारखा वाटला. तिनं कळवळून विचारलं, "काय झालं ?" बाबांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. आणि फुटला तरी काय सांगणार होते ? कसं बसं सगळा जीव एकवटून म्हणाले, "आपण उघड्यावर पडलो. एका दिवसात उमेशनं आपल्याला भिकारी केलं.” इन्स्पेक्टरनं एवढं ऐकताच " आजोबा, कुणाविरुद्ध पोलीस चौकीत तक्रार करायची काय ?" "भल्या माणसा, कुणाविरुद्ध तक्रार करू ? पोटच्या एकुलत्या एक मुलाबद्दल ?" "आजोबा, तुम्हाला टॅक्सी करून देऊ का ? घरी जाणार का परत ?" "बाबा रे, कुठल्या घरी जाऊ?" "कुणाला फोन करणार का ? आजी रडू नका. चला आपण माझ्या घरी जाऊ." हा कुठला कोण, आपल्या घरी यायला आग्रह करतोय आणि आपला पोटचा मुलगा... "मला पुण्याला इथूनच एक फोन करता येईल का ?" अशी बाबांनी इन्स्पेक्टरला विनंती केल्यावरून समोरच्या बूथमधून फोन लावून दिला. "अनंता, आम्ही दोघे भिकारी झालो रे." सगळी घटना थोडक्यात आपल्या लंगोटी यार, जीवश्चकंठश्च मित्राला - अनंताला बाबांनी सांगितली. "तुझ्याकडे टॅक्सीसाठी पैसे आहेत का; नसले तरी इथं आल्यावर देतो, असे सांग आणि वहिनींना घेऊन दोघेही इथे या. माझे घर आपणा सर्वांना राहायला पुरेसे आहे. " इन्स्पेक्टरनं त्याच्या खात्रीचा टॅक्सीवाला बोलावला. त्याला सगळी हकीकत थोडक्यात सांगितली आणि आईला आत बसवले. "तुम्ही भाड्याची चिंता करू नका, मी इथे देईन,' असे म्हणून ड्रायव्हरला पेट्रोलसाठी पैसे काढून दिले. बाबांना भडभडून आले. एकदम वाकून इन्स्पेक्टरचे पाय धरू लागले. त्यांनी एकदम बाबांना मिठीत घेतले. डोळे पुसले आणि बाबांना टॅक्सीत बसवले. दोन्ही हात जोडून बाबा आईनं इन्स्पेक्टरला नमस्कार केला आणि टॅक्सी पुण्याच्या दिशेने धावू लागली. दोन बर्फाचे जिवंत पुतळे एकमेकांना चिकटून लोखंडी होऊन बसले होते. संपूर्ण वाटेत कुणीच एक शब्दही कोणाशी बोललं नाही. अनंता, वहिनी, त्यांचा मुलगा अतुल, त्याची बायको प्रीता एवढ्या रात्रीसुध्दा दारातच त्या दोघांची वाट बघत बसले होते. मुलाने सामान उतरवून घेतलं. टॅक्सीवाल्याला पैसे द्यायला लागला. ‘“माझे आई-बाबा गावाकडं आहेत. सुखानं भाकरी भाजी खातात. अशी पाळी शत्रूवरपण येऊ नये हो. पैसे कसले देता ? नको पैसे, ते केव्हाही कमवेन मी."- असे म्हणत टॅक्सीवालाही गहिवरला. त्याचेही डोळे भरून वाहू लागले. बाबा म्हणाले, ‘“अरे बाबा, 'त्या' इन्स्पेक्टरसारख्या देवमाणसाला कशाला खर्चाला पाडू ? कुणा-कुणाचे उपकार घेऊ बाबा ?" "आजोबा, मी इन्स्पेक्टर साहेबांकडून एक पै पण घेणार नाही. आज पहिल्यांदा देवाची पालखी खांद्यावर घ्यायला मिळाली, नाही म्हणू नका," असे म्हणून सगळ्यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा आईने पर्समधून एअरपोर्टवर घेतलेला कॅडबरीचा बॉक्स त्याच्या हातावर ठेवला. तरंग अंतरंग / ५२