________________
कलियुगाची ऐशीतैशी... आमच्या जिवलग बालपणीच्या दोस्ताचं, म्हणजे शाम्याचं दुकान भर बाजारात आहे. कधीही काहीही आणायला आम्ही बाजारात गेलो, तर या दोस्ताला घेऊनच फिरायचं आणि बाजारात अण्णा बरोबर असले तर ना कुणी खोटा माल गळ्यात मारणार, ना अवाजवी पैसे उकळणार. अण्णांचं वजन (म्हणजे समाजातलं; तसं शारीरिक ४५-५० किलो) आणि अण्णांबद्दल आदरच तसा आहे. रस्त्यावर बसून फळं, भाजी, गणपतीच्या दिवसातले सजावटीचे सामान, तवा- कढईसारखे लोखंडी सामान विक्री करणारे... सारेच त्यांना मानायचे. त्यांचे हे अण्णा म्हणजेच आमचा जिगरी दोस्त शाम्या. असू नये एवढा सज्जन. मऊ, मृदुभाषी. या दूर खेड्यापाड्यातून येणाऱ्या मावशा, ताया, जख्ख आजोबा... साऱ्यांचाच हा दोस्त आणि त्याचं दुकान म्हणजे अडीअडचणीला हक्काचं, थोडं विरंगुळ्याचं 'सेफ' ठिकाण. त्याच्याकडं बिनधास्त माल, पैसे ठेवण्यासाठीचं 'सेफ डिपॉझिट व्हॉल्ट' आमची पण गप्पांची मैफल, चहा- भजीसह त्याच्या दुकानातच रंगायची. हो, सांगायचं राहिलंच; सत्तरी ओलांडली तरी सगळ्या दोस्तांची नावं म्हणजे शाम्या, सुम्या, टग्या, रम्या, तम्या, बाळ्या, पम्या, अरण्या, शंभ्या, अन्या... ही सगळी शाळेतल्या बारशाला ठेवलेली, अजरामर काही दोस्त मिळून स्वर्गात भजी खात असतील; पण त्यांच्या नावाची 'आहुती' अजूनही त्याच नावानं इथं आमच्या आठवणींच्या 'यज्ञा'त चालू आहे. कुणा आजारी दोस्ताकडं जायचं, तर तिथूनच सगळे मिळून पेशंटच्या कॉटच्या आजूबाजूला जमले की, त्याचं दुखणं गप्पा - विनोदात; निदान अर्धं तरी, सहनीय व्हायचं. उतारवयात आजारानं आलेलं गांभीर्य कुठल्या कुठं पसार व्हायचं; शिवाय विशेष अडचण असली, तर सगळे सत्तरी ओलांडलेले आम्ही ज्येष्ठ नागरिक झपाटून काम वाटून पुन्हा तरुणाईत जबरदस्ती घुसायचो. म्हातारपण आम्हा सगळ्यांचं असं मजेत - 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू (वरचा) सुपंथ ।।' असं.. 'त्या' दिवशी अण्णा कुठंतरी बाहेर गेलेले. आमच्या रम्याने नेहमीप्रमाणे दुकानासमोर बिनधास्त बसणाऱ्या मावशीकडून, आम्ही त्या सद्गृहिणीला प्रेमानं 'बहिणाबाई' म्हणायचो, फळं घेतली आणि खिशात हात घातल्यावर लक्षात आलं, पैसे आणले नाहीत. फळांची पिशवी परत करायला लागला, तशी बहिणाबाई म्हणाली "बस्स का? गप घेऊन जायचं. अण्णांचे दोस्त तुम्ही पैशाचं काय घेऊन बसलाय " आणि जबरदस्ती पिशवी रम्याच्या स्कूटरला टांगली. शेवटचे दिवस मोजणाऱ्या मित्राच्या आईसाठी रम्या फळं दवाखान्यात घेऊन जाणार होता. खांद्यावर फाटकी चोळी आणि ठिगळ लावलेलं लुगडं नेसलेल्या 'त्या' बहिणाबाईचं बोलणं, रम्याचे डोळे ओले करून गेले. रम्या म्हणाला, "उद्या सकाळी आणून देतो हं." तशी जरा डोळे वटारूनच म्हणाली, "मी विचारलोय काय ?" तरंग अंतरंग / ४८