पान:तरंग अंतरंग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहिणार होतो; पण देवा समोर एवढं खोटं म्हणजे...!) असो... माझ्या मागण्या देवापुढे सादर केल्या. १) उत्तम, शुद्ध तुपा - तेलाचे डबे . २) कॉटवर मखमली, मुलायम बेडशीट (मनात उगीचच गुदगुल्या झाल्या.) ३) उत्तम सुवासाच्या रातराणी, सोनचाफा यांच्या माळा. मी देवाचे अस्तित्वच विसरून गेलो की सुगंधात. ४) अंघोळीला कायम गरम पाणी. (गॅस संपला तरी. ) ५) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असतो, तसा अंग पुसायला टॉवेल आणि पंचपक्वान्नाचे ताट. मागण्या वाचून देव म्हणाला, "बास." 'ठीक आहे. आता मी 'तथास्तु' म्हणण्यापूर्वी माझ्या प्रश्नांची उत्तरे दे - १) काहीतरी हवे असले की, अखंड नंदादीप लावता. एरव्ही स्वस्तातल्या स्वस्तातले एरंडेलच्या वासाचे तेल; तेही फक्त दहा-पंधरा मिनिटे चालेल एवढेच घालून घाईघाईने नमस्कार का करता? मग तुला तेला-तुपाचे डबे का हवेत ? २) अरे, देव्हाऱ्यातले कापड काळे, मिचकूट झालेले, पणजोबांच्या वेळचे आहे. बहुधा त्यांचाही पंचा फाटल्यावर त्यातला एक कोपरा अजून वापरतोस आणि तुला मखमली बेडशीट ? अरे मला एक स्क्वेअर फूट छान मखमलीचा तुकडा देव्हाराभर पुरतो की ? ३) एकदा स्वस्त झाली की, झेंडूची किलोभर फुलं आणून फ्रीजमध्ये ठेवून चार देवात एक फूल याप्रमाणे फुलं तू टाकतोस ? त्याच्यापण काळ्या पडलेल्या पाकळ्या काढून वाहतोस ? आणि तुला रातराणी, सोनचाफ्याच्या माळा हव्यात ? ४) थंडी असो वा गर्मी सरळ, सगळे देव पातेल्यात एकदम ओतून वर बेसीनचा नळ सोडून बुचकळून काढता की रे आम्हाला. 'एक मारी सब गोट्यांमधल्या डावासारखं आणि तुला अंघोळीला कायम गरम पाणी हवंय ? ५) जुन्या फाटक्या, विटलेल्या टॉवेलचा एक तुकडा आम्हाला पुसायला वापरता की रे; सुद्धा उरलेला तुकडा बाईला फरशी पुसायला देता त्या टॉवेल मधला. लाज विकली काय रे तुम्ही? शेंबुड पुसायला पण नवा रुमाल घेता की रे. त्यातला एक वापर की कधीतरी. हो, आणि चुकून एकादशीला आम्हाला घासायला म्हणून तुमचे दात घासून खराटा झालेला, वास मारणारा ब्रश वापरता. १० रुपयांचा एखादा नवा ब्रश घ्यायला तुमची इस्टेट उडून जाती होय रे ? आणि तुला मात्र फाईव्ह स्टारमधला टॉवेल पाहिजे ? ६) अर्धा चमचा साखरेचा नैवेद्य तुझ्या देव्हाऱ्यातल्या बावीस देवांना ? पुन्हा फोटोत दहा-वीस, कधी काळी गंध चिकटवलेले देव. ते अंघोळीला पण पारखे झालेले. वर लटकवून ठेवलेत ते वेगळेच. पण तुला मात्र पंचपक्वान्नाचे ताट हवे का ? तरंग अंतरंग / ४६