पान:तरंग अंतरंग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गप्पातून उभं केलं. एखाद्या गल्लीत स्कूटरवर बसून धूर सोडणाऱ्या अस्ताव्यस्त कपड्यातल्या कॉलेज कुमारिका मीही पाहिल्यात. पण बाळूकडं जरा जास्तच तपशील होता. माझे बाबा खुर्चीवरून उठून आत गेलेले बघून बाळ्याने छोट्या 'अंधाऱ्या खोली'तल्या फिल्म्सबद्दल जरा जास्तच वर्णनात्मक माहिती कुजबुजत सांगितली. "असलं वागल्यावर मग कशाला त्याची तब्येत राहणार रे. लांब राहा रे त्याच्यापासून, असा सल्ला मला द्यायलाही तो विसरला नाही. वर, माझ्या पिळदार दंडावर तेल ओतून मालिश करताना. ‘’झाक आहे रे बॉडी तुझी." असे प्रशस्तिपत्रही द्यायला विसरला नाही. एक वाडगाभर तेल जिरवून माझ्याकडून त्याच्या पाठीवर हात फिरवून घेत म्हणाला, "असं करावं लागतं, नाही तर माझ्या अंगाची आग आग होते." हे मला नवीनच होतं. मी पण अगदी लहान भावाच्या पाठीवरून फिरवावा, तसा ऊबदार हात बाळ्याच्या पाठीवरून फिरवला. आई-बाबा निघतो हां," म्हणत बाळ्या निघाला. एवढ्यात आई तुपातली मोठी डिश भरून ’गरम गरम खा रे बाळू, आम्ही अजून आहोत इथं, " म्हणत शिरा घेऊन आली. पटकन् तिचे पाय धरत माझ्या आईच्या माघारी, "तुमच्याकडचं खात - पितच मोठा झालो," म्हणत बाळू गहिवरला. मग बाबांनीही त्याची पाठ थोपटत "आमचे बाळासाहेब नसले तरी येत जा रे," म्हणून "घे, शिरा खाऊन घे, आणि पुनः मागितला नाहीस तर बघ, " अशी गोड 'धमकी' ही दिली. "हेच संपतं का बघतो, ' असं हसत म्हणत बाळ्यानं शिऱ्याचा फडशा पाडला आणि लगेचच आईनं पुन्हा डिश भरली. सकाळी आम्हा पोरांना सोडायला गाव लोटलं होतं. वास्तविक, सुट्टीनंतर पुन्हा कॉलेजला जाणं म्हणजे काय अमेरिकेला जाणं नव्हतं, तरी साऱ्यांच्या डोळ्यात गावातल्या प्रत्येक मुला - मुलीबद्दल ते स्वप्न मात्र तरळत होतं, एवढं नक्की. मी हळूच मान आत वळवून डोळ्यावर बांधलेलं धरण फुटू दिलं नाही आणि ते लपवायला "मंगलमूर्तीऽऽऽ" असा गजर एवढ्या मोठ्यानं केला की सारं स्टैंड "मोरयाऽऽऽ" च्या आवाजानं दुमदुमून गेलं. एसटी वळताना खिडकीतून मागे वळून बघितलं तर बहुतेकांचे पाणावलेले डोळे पुसण्यात हात गुंतले होते...

तरंग अंतरंग / ४४