पान:तरंग अंतरंग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गेलो तरी चहा घेतल्याशिवाय आम्हाला सोडत नाही. एवढ्याशा वयात एवढं शहाणपण कुठून घेऊन आली आहे कुणास ठाऊक! आई निघून गेल्यापासून रोज पहाटे उठून अंगण झाडून, सडा रांगोळी, सर्वांचं चहापाणी, स्वयंपाक करून, भावाला तयार करून शाळा गाठत असते. कधीही गेलो तर तोंडभरून कौतुक केल्याशिवाय आम्हाला राहवत नसे. मनात भडभडून येत असे. आता बघता-बघता ती ग्रॅज्युएट व्हायला आली; पण थकली नाही. तिच्या बापातही हळूहळू सुधारणा होत आली आहे. आम्ही गेलो तर आता बाहेर येऊन तो बोलतो. कुठेतरी नोकरी पण धरली आहे त्याने. परवा म्हणाला, "काका पळून गेलेल्या आईच्या मुलीबरोबर कुणी चांगल्या घराण्यातला मुलगा लग्न करेल का हो ?" क्षणभर हृदयात प्रचंड काहूर माजलं. आपल्या समाजात वावरताना त्याला वाटणारी भीती अनाठायी नव्हती. आवंढा गिळून आम्ही समजूत घालतो, "अरे, तुझी पोर सोन्यासारखी आहे. जाईल त्या घराचं नंदनवन करेल. तू चिंता नको करू. तिला मनसोक्त शिकू दे. आपण प्रार्थना करू. झालं. आता तुमचं दुर्दैव संपलं असं समज. आमच्या तुकारामाचे शेवटचे दिवस गोड होणार, हे नक्की. त्यानं कधीही कुणाला दुखावले नाही. तू काळजी करू नको." एवढ्या बोलण्यानेही त्याच्या तोंडावर तरतरी येई. माणसं अशी का वागतात ? सोन्यासारखा संसार सोडून एखादी आई पळून कशी जाऊ शकते ? उद्याचा भरवसा आता सज्जन माणसालाही अजिबातच राहिला नाही का ? हे समाजात काय चाललं आहे? संतांची कुळीच नाहीशी झाली आहे का ? समाजाला सन्मार्गावर ठेवणाऱ्या संतांची जागा आता लुटारू पुढाऱ्यांनी घेतली आहे का ? आमच्या तरुण पिढीला स्वार्थासाठी घाण्याला जुंपून स्वतःची घरं भरणंच फक्त सुरू आहे का ? चुलीत घातलं पाहिजे असलं दळभद्री राजकारण. सुदैवाने बऱ्याच तरुण मंडळींना आता जाग आली आहे. असल्या पुढाऱ्यांना झुगारून मोर्चात झेंडे नाचवायचं सोडून स्वाभिमानानं समाजात आपलं स्थान बळकट करण्याचं काम ते करीत आहेत. एवढंच समाधान ! पण त्यांचं काम सोपं नाही राहिलं. ज्येष्ठ नागरिकांनी आपले दिवस संपले, असं न समजता डोळ्यांत तेल घालून या आपल्या सोन्यासारख्या पोरा-बाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी, आपली दुखणी बाजूला ठेवून झटलं पाहिजे. आपल्या संतांचं थोडं तरी ऋण फेडलं पाहिजे. असं निश्चित घडेल आणि तुकारामच्या नातीसारख्या मुलांना चांगले दिवस येतील हे निश्चित !

४१ / तरंग अंतरंग