पान:तरंग अंतरंग.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"नको. तुम्ही जा. रात्रीपण माझी वाट पाहू नका. आम्ही रात्रभर गप्पा मारणार आहोत आणि उद्या सकाळच्या गाडीत त्याला बसवूनच मी घरी येतोय. ' आणि त्यानं फोन पटकन् ठेवला. पाच मिनिटांची भयाण शांतता मला सारंच काही सांगून गेली. मला काहीही कल्पना न देता माझा परतीचा प्रवास माझ्या जिवलग दोस्तानं ठरवूनही टाकला होता. वास्तविक, त्याच्या बंगल्यात दोन स्वतंत्र गेस्ट रूम्स होत्या. वहिनी असताना तर तिथल्या कपाटात पाहुण्यांच्यासाठी साबण, टूथपेस्ट, स्वच्छ धुतलेले टॉवेल वगैरे सारेच असायचे. "दोस्ता, माझं जाऊ दे तुझं कसं चाललंय सांग," असं उसनं अवसान आणून तो म्हणाला खरं; पण मग खोल आवाजात म्हणाला, "घरात आनंद उधळणाऱ्या घराच्या वास्तूबरोबर त्यातल्या कर्त्या माणसांचे खूप घट्ट संबंध असतात रे; विशेषतः घर मंदिरासारखं ठेवणाऱ्या, देवघराची शांतता, मांगल्य साऱ्या घरभर उदबत्तीच्या सुवासासारखं पसरवणाऱ्या गृहलक्ष्मीच्या जाण्याबरोबर घराचे वासेही फिरतात का रे? आणि याची सुतराम कल्पना घरच्या पुरुषाला गृहलक्ष्मी असेपर्यंत असतं नाही. ती जाणूनबुजून तुमच्या कामाच्या टेन्शनमध्ये भर पडू नये, म्हणून घरातली माणसं, त्यांच्यातले रुसवे-फुगवे, पाहुणे-रावळे, शेजारी-पाजारी या साऱ्याचा भार आपल्याच खांद्यावर वाहत असते का ? सारं सारं कसं सांभाळत होती कुणास ठाऊक," असं म्हणून दोन्ही हात जोडून छताकडे पाहिलं. गालावरून ओघळणारे अश्रू बेभानपणे वाहत होते. दुसऱ्या दिवशी मी खिडकीतून त्याची दूर जात असलेली मूर्ती पाहत होतो. मनात विचार आला, ब्रह्मदेव नातीगोती वरच ठरवून पाठवतो; मग कुटुंबातील एकाच व्यक्तीला या तंबूचा भार वाहणारा खांब का करावा त्यानं ? का हा, गृहलक्ष्मीच्या रक्ताचा आईकडून आलेला परंपरागत गुण ? गाडीच्या वेगाबरोबर मनातील गुंताही वाढत होता..... तरंग अंतरंग / ३६