पान:तरंग अंतरंग.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाठीशी हा बराच खंबीर, घट्ट मनाचा. आयुष्यात कठिणातले कठीण प्रसंग आम्हाला आश्चर्य वाटायचं इतक्या खंबीरपणे झेलले होते. आम्हालाही धीराचा सल्ला द्यायचा, उभा राहायचा; मग आता एकदम इतका का निराश झाला असेल हा? मला स्टेशनवर घ्यायला आला होता तेव्हा प्लॅटफॉर्मवरच मिठी मारून एकदम खांद्यावर डोकं ठेवून हुंदके देऊन रडला. मीही गलबलून गेलो. त्याला थोपटत मीच म्हणालो, "चल, घरी जाऊ आणि बोलू." माझ्या हातून माझी छोटी बॅग काढून घेत गाडीच्या मागच्या सीटवर ठेवून त्याने गाडी सुरू केली. त्याच्याकडे मी अनेकवेळा गेलोय. त्यामुळे स्टेशन ते घर हे बारा-पंधरा किलोमीटरचे अंतर आम्ही गप्पा मारत मारत चुटकीसारखे पार करत असू; पण आज भिडू काही बोलतच नव्हता. वाटेत नेहमीच्या त्याच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानासमोर पण गाडी नाही थांबली. मनात म्हटलं, साहजिकच आहे. वहिनी नाही; म्हणजे येताना 'तीर्थ', फरसाण आणण्याची तंबी कोण देणार? 'तीर्थ', फरसाणच्या अनेक समारंभाच्या आठवणीनं थोडं हसू पण आलं; थोड्या अंतरावर गाडी भलत्याच रस्त्याला लागल्याचे पाहून मी मनात चमकलो. भुवया ताणून त्याच्याकडे पाहिले; पण खिन्नपणे त्याने दुसरीकडेच वळवलेल्या मानेने मला जरा टोचलेच. इतक्यात एका हॉटेलसमोर गाडी उभी राहिली. पटकन् माझी बॅग घेऊन तो सरळ हॉटेलमध्येच घुसला. मी मागोमाग येतोय की नाही, याची पण दखल न घेता तो सरळ आधीच बुक केलेल्या रूममध्ये गेला. कॉटवर बॅग टाकली. कसंबसं म्हणाला, "सॉरी मित्रा..." आणि खुर्चीत कोसळला. मी रूम सर्व्हिसला फोन करून चहा मागवला आणि दुसरी खुर्ची ओढून त्याच्यासमोर बसलो. चहा घेतला. एवढ्यात त्याला फोन आला आणि का कोण जाणे, पण त्याने फोन स्पीकरवर ठेवला. समोरून त्याची सून बोलत होती, हे लगेचच लक्षात आले. " आले का मित्र तुमचे ?" "हो. आले. ' "मी बुक केलेली रूम चांगली आहे ना ?" "हो." " जेवायचं काय करता ?" "तू जेवून घे. माझ्यासाठी थांबू नकोस. " नाही. माझं झालं हो जेवण. तुमचं टेबलवर ठेवू का?" "नको. मी इथंच जेवतो. जा तू झोपायला." "आणि रात्रीचं काय ? रात्री पण दोस्ताबरोबर गप्पा मारायच्या असतील ना? मग तिथंच जेवून येणार असाल, तर आम्ही माझ्या एका मित्राकडे पार्टीला जायचं म्हणते. पाहिजे तर टेबलवर ताट वाढून ठेवते." ३५ / तरंग अंतरंग