पान:तरंग अंतरंग.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नातीगोती आमच्या शाळकरी दोस्ताची जीवनसाथी त्याचा हात सोडून साऱ्या जीवनपटाची कहाणी इथंच संपवून पुढील प्रवासाला निघून गेली. वहिनी दोस्तापेक्षा तीन वर्षांनी लहान म्हणजे पंचाहत्तरीच्या होत्या. पन्नास वर्षांचं साहचर्य एकाएकी संपुष्टात आलं होतं. आयुष्यातले, मनातले, हृदयातले सगळे कप्पे एकमेकांच्या सहवासात एकत्र साजरे केलेल्या अनेक सुखांनी आणि सहन केलेल्या दुःखांनी खचाखच भरून गेलेले होते. कसलाही प्रसंग आला तरी एकमेकांचे हात घट्ट धरूनच उत्तरं शोधली होती. एकमेकांची सावली होऊन राहिलेली अशी ही जोडी आम्हा सर्वच सोबत्यांना 'आदर्श' वाटायची. अनेकदा आमच्यातल्या अनेक घनिष्ट मित्रांनी त्यांच्या घरी मुक्काम ठोकून एक वेगळा जिव्हाळा, आत्मीयता, पाहुणचार मनसोक्त रिचवला होता. अचानक वहिनी गेल्याची बातमी कानोकानी पसरली. कुणाच्या तब्येती बरोबर नव्हत्या, कोणी दवाखान्यात अॅडमिट होते; तर कुणी दूरच्या टूरवर पण अस्थिविसर्जनाला बहुतेक सगळे दोस्त हजर झाले. अस्थी गोळा केल्यावर घरच्या लोकांना बसायला सांगून साऱ्या मित्रांनी गायीच्या शेणानं ती दहनभूमी सारवायचे काम भरल्या डोळ्यांनी पार पाडले. फुले वाहिली, नमस्कार केला. दोस्ताच्या पाठीवर हात ठेवून दुःख हलकं करण्यासाठी सांत्वन केलं आणि बहुतेक सारे आपापल्या घरी खिन्न होऊन परतले. अधून-मधून फोनवर चौकशी सारेच करत होते; पण त्याचा उत्साह पूर्णपणे आटून गेलेला जाणवत होता. का कोण जाणे; पण कितीही प्रयत्न केला तरी जिवंत राहणे त्याच्यासाठी एक सोपस्कार होऊन राहिल्यासारखे त्याच्या बोलण्यावरून वाटत होते. माझी आणि त्याची दोस्ती तर अगदी घट्ट होती. मला राहवेना आणि मी एक दिवस फोन करून त्याच्याकडे यायचा विचार करतोय, असे सांगितले. वहिनी असताना मी असा फोन केला की तो हुरळून जायचा व म्हणायचा, "अगं ऐकलंस का, मन्या येतोय चार दिवसांसाठी." त्याच्या हातातून फोन हिसकावून वहिनी लगेच उत्साहाने आपले सारे बेत सांगून माझाही उत्साह आनंद द्विगुणित करत असत. "तुम्ही सकाळीच इथे पोहोचले पाहिजे," अशी तंबी पण द्यायला विसरायच्या नाहीत. एखाद्या घरात पाहुणे-रावळे वर्दळीने येणे, आपुलकीनं दोन-चार दिवस राहणे, किंवा तसे राहावे वाटणे, हे मुख्यतः गृहलक्ष्मीच्या 'आपुलकी'वरच अवलंबून असते, हे नक्की. अगदी एखादा माहेरचा घट्ट नात्यातला कोणी आला आहे, अशी वहिनींची सरबराई असे. आनंद देणे आणि प्रसादासारखा तो वाटून घेणे म्हणजे घर..! असाच घर या शब्दाचा अर्थ; पण माझ्या या वेळच्या फोनवरच्या "मी येतो," म्हणण्यावर त्याच्या निरुत्साहाचं बरं ये, " म्हणणं मला मनाला वेगळीच सल टोचून गेलं, रुखरुख लागून राहिली. वाटलं, वहिनींच्या जाण्यानं एकदम हादरला असेल; पण तसा तरंग अंतरंग / ३४