पान:तरंग अंतरंग.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निबंध आम्हाला पाटील बाई मराठी शिकवत असत. शरीरयष्टी कृश. डोळे खूप खोबणीत, झोप न झाल्यास दिसतात तसे; पण खूप सुंदर शिकवत. पौगंडावस्थेतली आम्ही सारी मुलं. रंगून जायचो; शिवाय खिडकीतून बाहेर बघणाऱ्या मुलाला उगीच आडवे तिडवे प्रश्न विचारून झापत नसत. त्यांचे वडीलही प्रसिद्ध साहित्यिक होते. वडिलांचं बरंच साहित्य बरोबर घेऊन जन्माला आल्या असाव्यात. आमच्या बाई म्हणजे त्यांच्या वडिलांच्या पहिल्या बायकोची कन्या. त्या आणि त्यांची अकाली वृद्ध दिसणारी आई एकत्र राहत. या वयात एक बायको असताना बाईंच्या वडिलांनी दुसरी का करावी, याचा विचार पडे. आम्हा मुलांना जरा रागच यायचा. सारी सहानभूती बाईंच्याबद्दल वाटत असे. आम्ही चार-पाच मुलांनी त्या रागापायी एकदा जाऊन हळूच वडिलांच्या पाठीत प्रत्येकानं एक-एक गुद्दा घालायचं पक्कं ठरवलं होतं. वास्तविक, तो नवरा आणि त्याच्या त्या दोन बायकांमधील विषय होता. घेतील की त्यांचं ते बघून. आता हसू येतं; पण तो एक निष्पाप विचार होता. हल्ली आलटून- पालटून टीव्हीवरच्या मालिकेत सर्रास हेच दिसते. त्याची सुरुवात बाईंच्या वडिलांनी केली असावी. बाईंनी आम्हा मुलांना घेऊन एक ट्रिप काढली होती. मस्त तलाव, हिरवीगार वनश्री, थंडगार हवा, 'त्या' वरच्या झाडांच्या दाट सावल्यामुळे दूरवर दिसणारा गर्द गंभीर डोंगर आणि त्यात पौर्णिमेचं टिपूर चांदणं. गाण्याच्या भेंड्या, नकला, विनोद याचा धुडगूस जवळच्या रेस्टहाऊसमध्ये राहायची सोय होती. पण झोपणार कोण ? सारेच तलावाकाठी गप्पा-गाणी करत होतो. मध्यभागी शेकोटी करून भोवती कोंडाळं करून बसलो होतो. तलावातल्या पांढऱ्याशुभ्र चंद्राचं प्रतिबिंब आणि त्यावरून परावर्तित होणाऱ्या किरणांनी सर्वांचे चेहरे उजळून निघालेले होते. बाईंनी सांगितलेली वडिलांना दुरावलेल्या निष्पाप मुलीची गोष्ट ऐकून सर्वांचे गळे दाटून आले होते. रात्री झोपताना आम्ही एकमेकांत कुजबुजत असताना डोक्यात प्रकाश पडला की, ..... या गोष्टीतली मुलगी म्हणजे बाईच आहेत. त्यावर आमचं एकमत झालं. आता आम्हाला बाई फारच जवळच्या वाटू लागल्या. आम्ही कुजबुजत असतानाच मला उगीचच बाई जवळून गेल्याचा भास झाला. बाईंनी अर्थातच, या सहलीवर निबंध लिहायला सांगितला. मला काही केल्या बाईंनी सांगितलेली मुलीची गोष्ट डोक्यातून जाईना. मी बराच वेळ काहीच न लिहिता बसलो आणि अचानक एक-एक वाक्य कागदावर अवतरू लागलं. तलावातल्या पाण्यावरून परावर्तन होणारी चंद्राची किरणं आम्ही अधाशीपणे तरंग अंतरंग / ३०