पान:तरंग अंतरंग.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकदाचं कंडक्टरचं काम संपलं. त्याने डाव्या खिशातून चुना तंबाखूची डबी काढली. डाव्या तळहातावर उजव्या हाताची तर्जनी डबीवर, हळुवार तबला बरोबर लागलाय का, बघायला बोट नाचवतात तशीच नाचवत तंबाखू तळहातावर घेतली. तंबाखूच्या भागाचं डबीचं तोंड बंद केलं आणि डबीची दुसरी बाजू उघडून अंगठ्याच्या नखानं, नखभर चुना काढून तंबाखूच्या तोंडाला चुना पुसून डबी पुन्हा खिशात टाकली आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटानं मळणी सुरू केली. हात चाळण हलवतात तसा हलवून हलकेच एक चिमूट घेऊन अलगद उजव्या दाढेखाली सरकवली आणि म्हणाला, "हं! आता बोला साहेब. " एकदम काहीच न सुचून, 'रोज किती फेऱ्या मारता ?' 'कधी हिशोब चुकला का ? ' 'कधी कोणी खोटी नोट देऊन फसवलं का ?' वगैरे जुजबी प्रश्न 'त्यानं' विचारले; पण खरं तर 'त्याला' त्याच्या मुखवट्याआडचा चेहरा वाचायचा होता. कंडक्टर म्हणाला, "हे सगळं रोज घडतच असतं. सांगणार कुणाला ? खिशातले पैसे घालूनच बऱ्याच वेळेला हिशोब पुरा करायलाच लागतो; मग नुसतंच चहा-बिस्कीट खाऊन भागवायचं. माझी बायको शिक्षिका आहे. तिची बदली कितीही विनंती केली, तरी लांब पल्ल्यावर केली आहे. गावात पोस्टिंग पाहिजे असल्यास पन्नास हजार लागतील, म्हणाले होते. कुठून आणणार ? चार वाजता उठून ती आपला, माझा आणि शहरात शिकणाऱ्या पोराचा डबा तयार करती आणि जाती. मी हा असा फिरत असतो. तिकडं, पोरगं पाच-सहा जण मिळून एका खोलीत राहून अभ्यास करतं. आमचे कंडक्टर दोस्त डबा पोचवतात. असली सगळी तीन तिगाड्याची कुत्तरओढ आमची ! मुस्काटात खाऊन तोंड हसरं ठेवायचं बघा.' " एका क्षणात त्याचा संसार 'त्याच्या' डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यानं खांद्यावरनं बसच्या हादऱ्यानं घसरणारी त्याच्या जवळची पिशवी कंडक्टरला त्याच्या पत्र्याच्या पेटीखाली ठेवायला दिली. "आयुष्यात चढ-उतार येत असतात हो; पण आमच्या आयुष्यात फक्त उतारच आहे साहेब! आता बघा, दोघेही मर-मर मरतोय; पण टोकं काही जोडता येतच नाहीत. कॉलेजची दीड लाख रुपये फी भरायची आहे. विचारानं एक घास घशाखाली उतरत नाही. "काही काळजी करू नका, होईल काहीतरी सोय!" तो धीर देत म्हणाला. त्यांच्या गावाचा स्टॉप आला म्हणून तो उभा राहिला. घंटी वाजल्यावर बस थांबल्याबरोबर तो उठून तडक गडबडीनं खाली उतरला. मनात कुठंतरी आज रोजचं जगणं बदलण्यासाठी बाहेर पडल्याचं मानसिक समाधान 'त्याला' वाटत होतं. गाव सारं फिरून झालं, काहीही बदल झाल्याचं दिसत नव्हतं. धनगर आळी, तिथला शेळ्या-मेंढ्यांच्या हागण्या मुतण्याचा उग्र दर्प तसाच होता. रस्ते तसेच, जागोजागी खड्डे तसेच कसे राहतात हे लोक ! असं मनात येईपर्यंत कधी काळी 'तू'ही इथलाच एक भाग होतास; विसरलास ! दुरूनच, ओट्यावरच्या एकमेव तरंग अंतरंग / २८