Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो 'तोच' होता तसं त्यानं गाव तर केव्हाच सोडलं होतं. आता तिथं पुन्हा जायची त्याची लायकीच राहिली नव्हती. कधी तरी मनाच्या कुठल्या तरी अंधाऱ्या कोनाड्यात एक अनामिक, ऊर्मी 'त्याला' गावी घेऊन जायला प्रोत्साहीत करीत असे. अशावेळी सूट-बूट कोपऱ्यात फेकून इथला थाट, इथली आखडूगिरी 'सेफ'मध्ये कोंबून 'लॉक' लावून तो चालायला लागतो. असा दिवस आज पुन्हा उगवला होता. दारातच त्याच्याच 'बीएमडब्लू'ने त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघून शिटी वाजवल्यासारखा करकचून हॉर्न वाजवल्याचा त्याला संशय आलाच. तिकडं संपूर्ण दुर्लक्ष करून तो चालू लागला. स्टँडवर उभा राहिला. उगीचच टाईम टेबलच्या बोर्डापुढं उभं राहून गावाकडं जाणाऱ्या बसच्या वेळा त्याने नीट पाहून घेतल्या. बाजूलाच तिथून परतणाऱ्या एसटीचं रंगवलेलं परतीचं वेळापत्रक पूर्ण दुर्लक्षून 'आता नाही परतायचं, ' म्हणत बाकड्यावर एसटीची वाट बघत बसला. एसटी येताना लोकांना दुरूनच दिसली, तशी झुंडच झुंड एकमेकांना ढकलून, अजूनही न थांबलेल्या एसटीत घुसाघुस करु लागली. शिटा भरल्या तशी दारातली घुसमट थांबली आणि 'तो' शांतपणे आत जाऊन उभा राहिला. एसटीभर नजर फिरवली. एकाच्याही चेहऱ्यावर कणभरही समाधान नव्हतं. कसल्या ना कसल्या विवंचनेचं एखाद्या कोळ्यानं विणलेलं सुबक जाळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घट्ट चिकटलेलं होतं. कुठूनही अचानक येऊन टपकणारं दुःख आणि निराशेत पण उडू पाहणारे पंख 'त्या' जाळ्यात अडकूनच राहावेत, इतक्या मजबूत विणीचं ते जाळं. कितीही तडफड केली, तरी हाता-पायाची मंद होत जाणारी हालचाल गालातल्या गालात हसत दुरून पाहणारा कोळी एक-एक पाय टाकत येऊन 'त्याची' आजची पोट भरायची विवंचना मिटल्याचा आनंद साजरा करत असतोच. चेहऱ्यावर एक-एक-एक वळ उठत असल्याचे ‘त्याला' स्पष्ट दिसत होते. बहुधा सारे चेहरे तसेच ! कुठल्याशा स्टॉपवर बस थांबवण्यासाठी कंडक्टरनं घंटी वाजवली, तशी गाडी थांबायची वाट न बघता, मघाशी आत चढताना घुसणारी झुंड तशीच ढकलाढकल कर उतरती झाली. रिकाम्या झालेल्या सीटवर कंडक्टरच्या शेजारी 'त्यानं' बूड टेकलं. पाय ताणून शीण घालवला आणि हसून कंडक्टरचा चेहरा वाचला. 'त्याला' त्याचा चेहरा अवघड गेलेला पेपर टाकून वर्ष फुकट गेल्याच्या विवंचनेत हॉलमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यासारखा वाटला. कसनुसं हसत कंडक्टर म्हणाला, "जरा हिशोब चेक करतो मग गप्पा मारू या.” डोक्यावरच्या रॅकवर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीखालून पेपर काढून 'त्याच्या' हातात देत म्हणाला, "वाचा तोपर्यंत." 'त्यानं' पेपर डोळ्यांसमोर धरला. पण लक्ष कंडक्टर पुनः पुन्हा मोजत असलेल्या बंडलातल्या नोटा आणि कानावरची पेन्सिल काढून कागदावर मांडत असलेला हिशोब यावरच लागलं होतं. २७ / तरंग अंतरंग