पान:तरंग अंतरंग.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुठं माहीत होतं तिला ? उन्हातानाचं चालून चालून जीव गळ्याशी आला. कोपऱ्यावरच्या हातगाडीवर सुकी भेळ खाल्ली. घोटभर पाणी ढोसलं. चार बिस्किटांचा पुडा गणेशासाठी गाठोड्यात कोंबला आणि पुन्हा फरफट सुरू झाली. अजून पाच-सहा किलोमीटर गेले नाहीत, तोवर पोलिसांची गाडी अगदी जवळून गेली आणि कचकन् • ब्रेक मारून थांबली. दोन पोलिस दंडुके उगारत आले. काही बोलायच्या आत शिवाच्या ढुंगणावर सपकन् फटका पडला आणि तिच्यातली सगळी ताकद गळून पडली. पटकन् शिवाला आड घालून ती उभी राहिली, तशी दुसरा दंडुका तिच्या पोटावर पडणार तो तिनं गाठोड्याचा हात सोडून अडवला. म्हणाली, "नका पोटावर मारू दादा' 11 "का? एक काखेत आणि एक पोटात घेऊन निघालीस काय ?" साथीदाराला टाळी देऊन तोंड वळवून पचकन् थुंकून तोंडात अडकलेलं हसू पोलिसानं मोकळं केलं. पार्वतीला मेल्याहून मेल्यागत झालं. हीच बातमी तिला आपल्या जिवाच्या जोडीदाराला द्यायची होती आणि आता त्या बातमीचा पार चिखल केला 'त्या' जनतेच्या 'सेवेकऱ्या' नं. डोळ्यातनं गरम अश्रूंची सरच वाहायला लागली. आणि 'त्या' बंद गाडीतून लग्नात हौस असूनही न निघालेली वरात अंधाऱ्या, अघोरी, अनामिक, काळ्याकुट्ट भविष्याच्या दिशेनं निघाली. एखाद्या चोर-दरोडेखोराचा किंवा मग्रूर सराईत गुन्हेगाराचा मुखवटा चढवल्याचा भास उगीचच होत राहिला आणि माना खाली गेल्या.

तरंग अंतरंग / २६