________________
पायपीट आकडा "काय हो, आपलं गाव किती दूर आहे म्हणता ?" "३२७ किलोमीटर." ऐकून पार्वती दहा महिन्यांच्या गणेशाला छातीला कवटाळून मटकन् खालीच बसली. त्याला छातीला कवटाळण्यामुळं धडधड कमी होईल, असं वाटलं की काय कुणास ठाऊक! अंतरच केवळ छाती धडधडण्याचं कारण नव्हतं. पण हे फक्त तिलाच माहीत होतं. 'त्या' दिवशी शिवा अर्ध्या दिवसातच गडबडीनं घरी आला म्हणून ती एकदम खूष झाली. सांगावं, सांगावं म्हणून किती दिवस थांबली होती ती. फक्कड डबल साखर मारून चहा करायला ती वळतच होती, तर धाडकन् काहीतरी आपटल्याचा आवाज ऐकून गर्रकन् वळली तर शिवा उभ्याच्या उभा कोसळला होता. हात देऊन उठवायला गेली, तर शिवा तिच्याच कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडायला लागला. तिच्या पायाखालून जमीन केव्हा सरकून गेली कळलंच नाही. "अहो, काय झालं सांगाल काय ?" "नोकरी गेली गं माझी. पगारही नाही दिला. तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते म्हणाले साहेब. " "अहो, अजून भाडं द्यायचं बाकी आहे तेही तीन महिन्यांचं." " सामान गोळा कर, बांधाबांध आणि चल लवकर बाहेर अंधार पडायची वेळ झाली. भाकऱ्या तरी करून घेते हो..." असं ती त्याला म्हणाली आणि तिच्या लक्षात आलं, सकाळीच पिठानं डब्याचा तळ गाठला होता. तिनं फक्त चतकोरच भाकरी खाल्ली होती, बाकी सगळी शिवाच्या डब्यात भरून दिली होती. बाहेर अंधार पडायच्या आतच डोळ्यांपुढं गडद अंधार दाटला. त्यात आता या पोराला घेऊन तीनशे किलोमीटर चालायचं! "काय हुडकती आहेस ?" शिवा गडबड करत म्हणाला. "कुलूप?" ‘’अगं, कुलूप कशाला लावतीस ? घाल कडी आणि पड बाहेर." तिचे पाय दगडाचे झाले. दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा लग्न होऊन नव्या नवलाईचा एक-एक क्षण आठवून अंग-अंग शहारून गेलं. शिवाबरोबर सोन्यासारखा संसार सुरू होता, गणेशाचा प्रवेश झाला; तसे दिवस, फुंकर घालून उडणाऱ्या शिवरीच्या म्हातारीसारखे तरंगत - तरंगत हलके-हलके झाले. ...आणि हे काय आता मध्येच आक्रित आणलं या कोरोनानं ! एक गाठोडं डोक्यावर आणि कमरेवर गणेशाला बसवून भरल्या डोळ्यानं तिनं घराकडं पाठ फिरवली आणि उसन्या जोषानं शिवापाठोपाठ लगा-लगा चालायला लागली. पुढं काय वाढून ठेवलंय, २५ / तरंग अंतरंग