पान:तरंग अंतरंग.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आवाजात त्यांना विचारले, "काय झाले ? आरतीला अजून दोन तास आहेत. तुम्ही शांत व्हा आणि हवे तर बेशक मन मोकळं करा मावशी." "आता तू मावशी म्हणतो आहेस, म्हणजे आईचीच जागा देतो आहेस की." त्या क्षणभरच्या नात्यानेही तिच्या चेहऱ्यावर 'मातृत्व' मिळाल्यासारखी एक स्मितरेखा झळकून गेली व तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. "माझं लग्न वयाच्या आठव्या वर्षीच झालं. लग्न म्हणजे काय, तर एका मुलाला हार घातल्याचे आणि मस्त जिलेबीचे जेवण केल्याचेच फक्त आठवते. अरे, 'त्या' माझ्या जन्माच्या साथीदाराचा चेहराही आठवत नाही. लग्नानंतर लगेचच मी परत आमच्या घरी आले. नेहमीप्रमाणे मैत्रिणीबरोबर टिकरी, लंगडी, छप्पापाणी खेळण्यात माझे दिवस मजेत जात होते. ' " एक दिवस आई-वडील खिन्न होऊन माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला जमिनीवर गुडघ्यात मान घालून बसायला सांगितले. मला कसलीही कल्पना नसल्याने मी लगेचच बसले... आणि मग जे काही माझ्या लांबसडक केसांवर 'अत्याचार' झाले, ते माझ्या आरड्याओरड्यासह डोळ्यांतून अखंड वाहणाऱ्या पाण्याबरोबर वाहून गेले. याचं सर्वांत वाईट मला वाटत होतं, की आईने माझे हात धरून ठेवले होते आणि बाबांनी डोके. प्रत्यक्ष जन्मदाते हे कसं काय करू शकतात ? तुम्ही सुदैवी आहात रे बाबांनो. 'त्या' भयानक दिवसापासून आजपर्यंत मी आरसा पाहिलेला नाही. उरले ते गेल्या सत्तर वर्षांचे ठार कोरडे आयुष्य, माझ्या एकटीचे; आणि तेही सतत राबता असणाऱ्या एका मोठ्या वाड्यातील अंधाऱ्या खोलीत एकाकी गेले. माझ्या कुठल्याही मैत्रिणीला माझ्याकडे येता आले नाही. त्यांच्यासाठी म्हणे मी एक विधवा, अपशकुनी होते....आणि माझी सावली त्यांच्यासाठी अभद्र. जिवंत; पण सुकलेल्या, कधीच फळ लागू न शकणाऱ्या एखाद्या रोपासारखीच माझी स्थिती होती...... पटकन् डोळे पुसत ती म्हणाली, "मग आता सांग मला नातू कसा होईल ?" आणि ती मोठ्याने हसली.. 'ते' भयाण हास्य माझा थरकाप उडवून गेले. मी पटकन् उठलो. त्या वाहत्या गंगेच्या प्रवाहातून पसापशाने घटाघट पाणी पिऊन दाटलेला घसा ओला केला आणि तोंडावर पाणी मारून परत आलो. मावशी त्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या गंगेत आपले प्रतिबिंब पाहत असाव्यात किंवा तेवढ्याच वेगाने मनात उसळणाऱ्या प्रचंड लाटा सोसत असाव्यात. थोडं भानावर आल्यावर मी विचारले, "पण तुम्हाला दोन दिवे का वाहायचे आहेत ?" पुन्हा हसत ती म्हणाली, "अरे, एक दिवा चेहरासुद्धा न आठवणाऱ्या माझ्या जीवनसाथीसाठी, तुम्ही काय म्हणता, ते 'बेटरहाफ' साठी नको का वाहायला ?" "आणि "दुसरा ?" " "अरे, मीच नसले तर माझा दिवा मुक्तीच्या दिशेने कोण सोडणार ?" मला एक शब्दही बोलणे शक्य नव्हते. तिचे दोन्ही दिवे मी पाण्यात सोडले. एक २३ / तरंग अंतरंग