पान:तरंग अंतरंग.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आलवण माझ्या ऋषिकेश, हरिद्वार, चारधाम यात्रा दोन-तीन वेळा झाल्या आहेत. गंगेच्या किनाऱ्यावर मला एकट्यालाच शक्य तेवढ्या एकांतात मनसोक्त बसायला आवडतं. बहुतेकदा अशावेळी मला माझ्या घराण्यातल्या माहीत असलेल्या; पण हयात नसलेल्या जास्तीत जास्त नातवाईकांची तीव्रतेने आठवण येते. त्यांच्या काळी मनात कितीही तीव्र इच्छा असली, तरी काशी यात्रा, हरिद्वार हे आजच्या इतके सहजसाध्य नव्हते. यात्रा करून सुखरूप परत आल्याच्या समाधानातच छोटासा समारंभ होत असे. सर्व लहान-थोर अशा 'तीर्थयात्रिका'च्या पायावर डोके ठेवून नमस्कार करत, गंगेचं तीर्थ घेत, प्रसाद घेत आणि आपणच प्रत्यक्ष यात्रा केल्याच्या समाधानाने ते मनापासून तृप्त होत. या साऱ्या मंडळींनी या 'तीर्थयात्रिका 'ला; काशी विश्वनाथ, गंगेला अर्पण करण्यासाठी अगदी चार अण्यापासून ते अख्ख्या बंद्या रुपयांपर्यंत पैसे दिलेले असत आणि यात्रिकही त्याचा पै आणि पै चा कागदावर लिहिलेला हिशेब सर्वांना पोचवत असे. मला आठवते, मी कैलास प्रदक्षिणेहून आल्यावर आमच्याबरोबर या सहलीत असलेल्या पण कैलास प्रदक्षिणेस न आलेल्या, पेशाने डॉक्टर असलेल्या माझ्यापेक्षा वयस्क अशा एका उत्तम प्रवचनकार पती-पत्नीने माझ्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला होता, त्यावेळी मी अक्षरशः संकोचून गेलो होतो. मला ते म्हणाले होते, "तुम्ही तीन दिवस चालून १८ हजार फुटांवर चढून घेतलेले कैलासदर्शन तुमच्या पायावर डोके ठेवल्याने आम्हालाही पावते. " या यात्राकालात डॉक्टरांच्या रोजच्या उत्कृष्ट प्रवचनानंतर आम्ही रोज त्यांच्या पाया पडत असू. आता ते माझ्या पाया पडले होते. आपल्या सुसंस्कृत संस्कारांचा मी पणा विसरायला शिकवणारा हाही एक भाग. म्हणूनच अशा ठिकाणी हयात नसलेल्या घरच्या वंदनीय ज्येष्ठ आणि कनिष्ठ मंडळींची आठवण येऊन, त्यांनी न पाहिलेले हे गंगेचे रूप मी त्यांना माझ्या नजरेने दाखवतो आहे, या कल्पनेने मला अपार समाधान लाभते, मोहरून जायला होते. असो. तर असाच संध्यासमयी हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीपूर्वी जरा लवकरच जाऊन स्वच्छ घाटावर मी बसलो आणि 'त्या' अथांग प्रवाहाचे रूप पाहत मुग्ध होऊन गेलो. तेवढ्यात एक साधारण सत्तरीची; पण 'आलवण' नेसलेली अतिशय सुस्वरूप स्त्री माझ्याजवळ येऊन म्हणाली, "गंगेची आरती होत असताना मोठ्या द्रोणातून गंगेत सोडायचे दोन दिवे माझ्यातर्फे सोडाल का." त्यांच्या व माझ्या वयातील अंतरामुळे मला त्यांनी एकेरी संबोधणेही योग्य झाले असते. 'अहो जाहो'च्या भाषेने थोडे अवघडल्यासारखेही झाले असते. म्हणून मी म्हणालो, "मी तुमच्या नातवासारखा आहे मावशी, मला 'अहो जाहो' नका करू." "अरे, मला कुठला नातू असायला ?" एवढं त्यांनी म्हटलं आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. मावशींचे थरथरते हात हातात धरले आणि जड तरंग अंतरंग / २२