पान:तरंग अंतरंग.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोदेला एकदम आपलं बालपण आठवलं की काय कोण जाणे! हे सारं आपण अनुभवलंय, असं काहीसं वाटत असावं. एवढं तान्हं बालपण आठवू शकतं का ? तेव्हा काही कळतं का? मग तिला वाटलं, कृष्णाला नाही का टोपलीतून यमुनेच्या पाण्यात पाय बुडवावा वाटला. या विचारानं मात्र तिचं समाधान झालं. दुसऱ्या दिवशी मात्र एवढ्या छोट्याशा कालवडीच्या गळ्यात दोरी का बांधली हे गोदेला कळेना; पण बाबा मंजिरीची धार काढायच्या, मंजिरीपुढं पेंड - भिजवलेले हरभरे ठेवण्याच्या गडबडीत होते. म्हणून ती मूकपणे पाहत राहिली. बाबांनी पाडीच्या गळ्यातली कडीला बांधलेली दोरी सोडली, तशी ती थेट दुशा मारत अधाशासारखं दूध ढोसायला लागली. पण दोन-तीन मिनिटांतच बाबांनी जबरदस्ती तिचं तोंड बाजूला ओढून तिच्या मर्जीविरुद्ध पुन्हा कडीला बांधलं. आणि मंजिरीच्या पायाला दोरीनं भाला घालून कासंडी गुडघ्यात धरली ... आणि धार काढायला बसले. दोन्ही हातांनी भरा वाहणाऱ्या दुधाच्या धारा कासंडीत वेगळंच संगीत देत होत्या. गोदा मुग्ध होऊन हे सारं विलक्षण दृश्य डोळ्यानं घटाघटा पित होती. एवढ्यात बाबांनी तिच्यापुढं भांडंभर फेसासकट दूध धरलं. ती भांडं तोंडाला लावणार एवढ्यात मंजिरीनं खसकन तोंड वळवून तिच्याकडं करुणपणे पाहिलं. मंजिरीच्या डोळ्यांतून टपोरे मोती वाहत होते. गोदा कासावीस झाली. भांड्यातलं दूध तिनं छोट्या पाडीसमोर धरलं. पाडीनं गटागटा ते पिऊनही टाकलं. बाबा एकदम कासंडी बाजूला ठेवून थक्क होऊन त्या दोघींकडं पाहतच राहिले. गोदेला आपल्या आईच्या मांडीवर असतानाची मंजिरीची नजर आठवली असावी. आपण हे कधीतरी पाहिलंय, असं तिला सारखं वाटू लागलं. ती बाबांना एवढंच म्हणाली, ‘’बाबा, उद्यापासून दूध पिताना पाडसाचं पोट भरेपर्यंत त्याला दूर नका आणि ती मंजिरीच्या गळ्यात हात टाकून बिलगली. मंजिरी तिचे केस आईच्या मायेनं हुंगायला लागली. मंजिरीला खात्री झाली. काही न सांगताच गोदा समजली होती. गोदेत आणि गायीच्या पिल्लात काय फरक होता ? करू... ܀܀ २१ / तरंग अंतरंग