पान:तरंग अंतरंग.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोदा तान्ही गोदा आपल्या आईच्या मांडीवर लोळत, परसदारी एकटक मंजिरीला न्याहाळत होती. तिची नजर तिथून हालतच नव्हती. मंजिरीचे पाणीदार डोळे बहुधा तिला विलक्षण मोह पाडत असावेत. मंजिरी आता मोठी झाली होती. आपल्या आईच्या अंगाला अंग घासत - घासत गव्हाणीतला नुकताच शेतातून आलेला हिरवागार चारा खात होती. गोदा मधूनच आपल्या आईच्या पदराआड लपून एका हाताने आईच्या हातातल्या चमचमणाऱ्या पाटल्यांशी खेळत, तोंडाने मचमच आवाज करत चरणाऱ्या मंजिरीकडे तृप्त नजरेने पाहत होती. वास्तविक, गोदाच्या आईला परसदारी असं बसून गोदाला पाजणं मुळीच पसंत नव्हतं. पण गोदाला दुसरीकडं कुठंही इतक्या शांतपणे हसत-खेळत आपलं पोट भरायला आवडतच नसे. गोदाचा आणि मंजिरीचा जणू एक मूक संवादच चालत असे. पदरा अडून हसत-हसत बघत असताना गोदा एकदम विलक्षण गंभीर झाली. आईला कळेना एवढ्याशा पोरीला मंजिरीनं काय सांगितलं असावं ? तिनं मंजिरीच्या डोळ्यांकडं पाहिलं तर टपोरे मोती घळघळून वाहत होते आणि गोदानं आपलं पिणं अचानक थांबवलं. एक हुंदकाही बाहेर पडला. तसं आईनं तिला एकदम खांद्यावर घेऊन थोपटायला सुरुवात केली. गोदा मान वळवून वळवून मंजिरीच्या डोळ्यात पाहत होती. त्यांचा काय संवाद झाला फक्त श्रीकृष्णाला माहीत ! गोदा आत जायला तयार होईना, तशी मान हलवून मंजिरीनं आपले डोळे कपिलेच्या अंगाला पुसले. बहुधा गोदाला म्हणाली असावी, 'तू मोठी झाल्यावर माझ्या गळ्यात हात टाकून मला गोंजारशील ना तेंव्हा सांगते, मला का भरून आलं ते " बघता-बघता गोदा मोठी झाली. शाळेतून आल्यावर दप्तर कोपऱ्यात भिरकावलं की, थेट गोठा गाठायची. आज त्याला एक वेगळं कारण होतं. मंजिरी आई होणार होती. एक वेगळीच मैत्री मंजिरीत आणि गोदेत घट्ट होत होती. रोज उठल्या उठल्या गोठ्यात जाऊन मंजिरीच्या गळ्यात हात टाकूनच तिच्या दिवसाची सुरुवात व्हायची. एक हिरवीगार पेंडी सोडून तिच्यापुढं टाकून तिला गोंजारून, थोपटूनच ती दात घासायला जायची. कुठल्या जन्मातली जोडी होती कुणास ठाऊक! आणि आज मंजिरीला पण पाडी झाली. जन्मल्या - जन्मल्या आपल्या खुरावर धडपडत उभी राहत होती. पण साऱ्या अंगाच्या चिकटपणामुळं घसरून पडत होती. गोदाची नजर एक क्षणभरही 'त्या' नव्याने अवतरलेल्या पाडीवरून हलत नव्हती. बाबांनी दोन्ही हातांच्या कवेत धरून पाडीला मंजिरीच्या तोंडाजवळ सरकवली, तसं पाडसाचं सारं अंग चाटून चाटून मंजिरीने स्वच्छ केलं. 'तुझी आई आहे तुझ्याबरोबर, ' याची ग्वाही दिली आणि बघता-बघता हे नवीन बाळ दुधासाठी थानाशी धसमुसळेपणा करू लागलं. तरंग अंतरंग / २०