________________
दरवाजापर्यंत पोचलो. आत कसलीही हालचाल जाणवली नाही, माझी चाहूल आत लागल्याची प्रतिक्रिया मला जाणवली नाही. बाहेर, एक बऱ्यापैकी मोठा दगड आणि बाजूला एका लाकडी डोणीत पाणी दिसले. मी समजलो ही पाय धुण्याची, स्नानाची व्यवस्था असावी. पुढे झालो. डोणीच्या बाजूला असलेल्या एका पानाच्या द्रोणातून पाणी घेऊन खळखळून चूळ भरली. पाणी खूप गार होते. दाट झाडींतून कुठे-कुठेच सूर्याचा डोळा चुकवून काही चुकार, उनाड किरण येत होते. त्यामुळे जमीन वा ते पाणी तापण्याचा प्रश्नच नव्हता. चेहऱ्यावर पाण्याचा गार शिडकावा नव्याने उत्साह वाढवून गेला! पिशवीतला पंचा काढून चेहरा पुसला आणि मागे वळलो, तोच एक अत्यंत तेज:पुंज व्यक्ती दारात उभी राहून माझीच हालचाल टिपत असल्याचे लक्षात आले. मी चार हात अंतरावर जाऊन डोळे मिटून देवाच्या मूर्तीला करतो, तसे वंदन केले आणि स्तब्ध उभा राहिलो. काय वाढून ठेवले आहे, याची सुतराम कल्पना येईना. त्या 'पुरुषोत्तमा'चा चेहरा मात्र अत्यंत मवाळ ; पण कोरा वाटला. अत्यंत मार्दवतेने विचारले, "आपण कोण ? माझ्याकडेच आला आहात की वाट चुकल्याने इथे आलात ?" त्यांच्या मृदु आवाजाने मी एकदम भारावून गेलो. एका अगांतुक, नको असलेल्या पाहुण्याला पाहून व्हावी, अशी त्यांची अवस्था होईल, अशी माझी अपेक्षा असावी; पण त्यांच्या सौजन्याने मी थोडा सावरलो. शब्द गोळा करून एवढेच म्हणालो, "आपलीच भेट व्हावी, या अतिशय उत्कट लालसेने मी आलो आहे." अजूनही मला आत यायला न सांगता ते थोडा वेळ तसेच स्तब्धतेत, मला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत राहिले. मीही अवघडल्यागत लटकणाऱ्या पिशवीशी चाळा करत उभा राहिलो. थोडेच क्षण न्याहाळल्यावर एकदम माझ्या पाठीवर थोपटत सरळ आत घेऊन गेले. मला नाही उमगले की, या दोन मिनिटांत त्यांना माझ्याबद्दल कसले ज्ञान झाले! त्यांच्या चेहऱ्यावरचे किंचित हास्य पाहून उगीचच मी पण कुणी पूर्वजन्मी योगी कुळातला होतो की काय आणि या 'सत्पुरुषा'ने माझी कुंडली मांडून अभ्यासली सुध्दा की काय असा एक आशाळभूत, हावरट विचार मनात आला. बाजूलाच गुंडाळून ठेवलेली चटई माझ्याकडे सरकवून आपणही तशाच एका चटईवर 'पद्मासना'त ते ताठ बसले. मीही समोर तसाच बसलो. वास्तविक, डॉक्टरांनी मला गुडघ्याच्या दुखण्यामुळे मांडी कधीही घालायची नाही; एवढेच नव्हे, तर जमिनीवर बसायचेही नाही, अशी तंबी व पसाभर गोळ्या दिल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, मी मोठ्या आरामात अनेक वर्षांनंतर सरळ 'पद्मासनात एकदम सहजतेने बसू शकलो आणि गुडघ्यांनीही काही 'तक्रार नोंदवली नाही. हे कोडे मात्र काही सुटले नाही. 'घाला इथे पद्मासन, बिनदिक्कत केव्हाही," असे म्हणून माझ्या मनातल्या विचारांवर सरळ स्वच्छ प्रतिक्रियाच व्यक्त केली होती त्यांनी ! १७ / तरंग अंतरंग