पान:तरंग अंतरंग.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आता पण मी, माझ्या अचानक वाचण्यात आलेल्या एका, जवळजवळ अज्ञातवासात राहणाऱ्या केवळ कंदमुळे, फळे खाऊन गेली अनेक वर्षे अंतरात्म्याचा शोध घेणाऱ्या 'सत्पुरुषा'बद्दलच्या प्रचंड उत्सुकतेने आणि तीव्र ओढीने ही वाकडी वाट धरली होती. इतर कशाचीही, काहीही माहिती नव्हती. तिथे मला राहता येईल का ? माहीत नाही. राहण्यासाठी एखादे छप्पर आहे का ? - माहीत नाही. - माहीत नाही. खाण्या-पिण्याची सोय आहे का ? या 'सत्पुरुषा' शिवाय तिथे इतर कुणी राहते का ? माहीत नाही... तारुण्यातील त्या-त्या वेळच्या संसारबंधनात असताना केलेले श्रम, त्या श्रमाचा मोबदला. मोबदल्याचा विनियोग. भविष्याची बेगमी आणि सतत शेजारी-पाजारी पाहत जीवनस्तर वाढवत नेण्यासाठी केलेले आणखी श्रम. आणखी मोबदला... या अनुत्तरित क्लिष्ट गणिताचे ते आव्हान पेलण्यात आपली छाती 'निधडी' असल्याच्या भ्रमात किती काळ गेला, याचा हिशोब लागलाच नाही. आता थोडी मानसिक उसंत मिळाल्यासारखे वाटले आणि ही अज्ञात शोधाची वाट पकडली. किती वेळ चालत होतो कुणास ठाऊक! वेळ कळायला घड्याळ कुठं घेतलं होतं ? घड्याळच काय, पिशवीत फक्त एक अंगरखा, एक लुंगी आणि एक पंचा याखेरीज एक पाण्याची बाटली सोडली, तर इतर काहीच घेतले नव्हते. तिकिटाचे पैसे देऊन कंडक्टरने परत दिलेली किरकोळ, परतीच्या प्रवासाला लागलीच तर उपयोगी येईल, अशी रक्कम सोडल्यास ना साबण, ना तेल, ना कंगवा ! थोडी तहान लागल्यागत वाटले म्हणून एका चौरस ; पण ओबडधोबड दगडावर बसलो आणि पाय ताणले. पाण्याचे चार घोट घशाखाली गेल्यावर जरा 'हुशारी' वाटली. बाजूलाच दगडावर ठवलेली पिशवी उजव्या खांद्यावर अडकवली आणि पुन्हा अज्ञाताकडे चालू लागलो.. अंदाजे पाच-सात किलोमीटर चाललो असेन. दूरवर एक छोटी, गवताने शाकारलेली झोपडी नजरेला पडली आणि उत्सुकता थोडी ताणली. आश्रमच असावा, असा आपल्याला 'फेव्हरेबल' विचार मनात नक्की केला. इथं येण्यापूर्वी मी माझ्यापुरते काही 'नॉर्म्स' मनाला विचारून नक्की केले होते. एक - कुठलीही अतिफाजील उत्सुकता डोक्यात ना येऊ द्यायची; आणि आली तरी ना व्यक्त करायची. थोडक्यात, मुमुक्षु वृत्ती पक्की बाळगायची. दुसरं- 'मौनं सर्वार्थ साधनम्' हा मंत्र जपायचा. कसलीही चिंता करायची नाही. तिसरं म्हणजे डोळे आणि मेंदू पूर्ण उघडा ठेवून जेवढं काही मनावर, मेंदूवर कोरण्यासारखं असेल तेवढं कोरून ठेवायचं. बघता-बघता 'तो' निवारा दहा पावलांवर आला. मी आणखीच दक्ष होऊन तरंग अंतरंग / १६