पान:तरंग अंतरंग.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्मशोध जवळजवळ अठरा-वीस तास बसचा प्रवास चालूच होता. बसतानाच कंडक्टरच्या हातात माझे उतरायचे ठिकाण इंग्रजीत मोठ्या अक्षरात स्वच्छ कागदावर लिहून दिले होते. बऱ्यापैकी गर्द झाडीच्या जवळजवळ निर्मनुष्य भागातून, खाच-खळग्यातून डुलत- डुलत प्रवास सुरू होता. मध्ये बराच वेळ शांततेत गेल्यावर प्रथमच बसची घंटी वाजली. आणि पाठोपाठ कंडक्टरने आपली जागा सोडली आणि हातात मी दिलेला कागद वाचत-वाचत माझ्यापाशी येऊन उभा राहिला. तामिळ भाषेत; पण इशाऱ्याने माझे उतरायचे ठिकाण आल्याचे माझ्या खांद्यावर हलकेसे प्रेमाने थोपटून त्याने सांगितले. थोडे वाकून, खिडकीतून बाहेर बघत डाव्या बाजूला दूरवर जाणाऱ्या एका पायवाटेकडे बोट वळवून माझ्या पुढील प्रवासाची दिशा दाखवली. मीही खुणेने त्याच्या मनगटी घड्याळात 'किती वाजलेत,' विचारल्यावर बोटे दाखवून चार वाजल्याचे जाहीर केले. वरच्या सामानाच्या रॅककडे पाहत खुणेनेच माझ्या सामानाबद्दल विचारपूस केली. मी हसतच बाजूलाच ठेवलेली एक छोटी, लांब पट्ट्याची पिशवी खांद्यावर अडकवली आणि उतरण्यासाठी चालकाच्या बाजूने जाता-जाता हात हलवून चालकाचे आणि कंडक्टरचे आभार मानले; आणि उतरणार एवढ्यात कंडक्टर गडबडीने पुढे आला अत्यंत आदबीने, थोडीशी मान झुकवून मला नमस्कार केला आणि मी उतरलेल्या दिशेने माझ्याकडे पाहत राहिला. या गूढ हालचालींचे आणि मला दाखवलेल्या आदराचे मला थोडे आश्चर्यच वाटले. अवघडल्या अंगाचा आंबटपणा, दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हात डोक्यावरून ताण देऊन झटकून टाकला, तरी अठरा-वीस तासांचा तो प्रवास भेट म्हणून भरपूर थकवा देऊन गेला. रस्त्याला लागूनच दुसऱ्या बाजूला एक लांबलचक, बाकासारखा पसरलेला स्वच्छ, गुळगुळीत दगड, मला आवाहन करत होता. आळस आणि थकवा यामुळं घडीभर त्यावर आडवं व्हावंसं वाटलं. आणि, 'जरा पडू आणि शीण घालवून मग चालू लागू,' असे ठरवले आणि त्या दगडावर आडवा झालो. अर्थात, सूर्य बुडत आला होता. तेव्हा, अंधार पडायच्या आत ईप्सित स्थळी जायचे आहे, याची मनाला खूणगाठ बांधली. चालकाने आणि कंडक्टरने खिडकीतून मी आडवा झाल्याचे पाहिले आणि हात हलवून मला निरोप देऊन ते मार्गी लागले. मीही विश्रांतीच्या कुशीत शिरलो. ......का., कुणास ठाऊक! जरा जास्तच 'हुशारी ' वाटली. चांगली आठ-दहा तास गाढ झोप झाल्यावर वाटावी तशी! हा 'त्या' थंडगार दगडाचा गुण असावा; मी गडबडीनं उठलो आणि झपाझप चालू लागलो. किती दूर आहे, किती चालायचे काहीच ठाऊक नव्हते. अज्ञात प्रवास ! वास्तविक, साऱ्या जीवनाचा प्रवासही तसा अज्ञातच असतो. आपण ठरवतो एक आणि आपल्यापुढे वाढून दुसरेच काही तरी ठेवलेले असते. १५ / तरंग अंतरंग