पान:तरंग अंतरंग.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिळवून माझ्यासाठी मोठचं आव्हान उभं करून ठेवलंय. ' तपन मोठ्यानं हसत म्हणाला, 'अगं, मेडिकलला सोपं असतं मिळवणं. फक्त एका शरीराचा तर अभ्यास असतो. ' यावर दिवे ओवाळल्याचा अभिनय करत रिया म्हणाली, 'हातोडी मारण्याएवढं सोपं नाही ते महाराज!' आणि ते चौघेही मोकळेपणाने हसले. आमच्या चेहऱ्याची सुरकुती मात्र काही मोडली नाही. 'मग पुढच्या प्लानिंगसाठी तुझ्याच कुवतीचा जोडीदार पाहून ठेवलास की नाही, रिया ?' मोहनच्या या प्रश्नावर, विषयाला हात घालण्याच्या त्याच्या कौशल्यावर मी एकदम फिदा झालो. मोहनच्या प्रश्नावर रिया अचानक लाजली. तिच्या सुंदर गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावरची लाली स्पष्टच सारं काही सांगून गेली. पण म्हणाली, 'काका, अगोदर मला डॉक्टर तरी होऊ दे !' 'हे बघ रिया, मी रिटायर झालो तरी आमचे गुप्तहेर टेकडीवर फिरायला जात असतात.' टेकडीवर हा शब्द ऐकताच रियाचा चेहरा एकदम गोरामोरा झाला आणि गंभीर झाला. आता तिचे आईवडील मात्र गंभीर झाले. रियासुध्दा 'मला कॉलेजला जायचंय' असं सांगून एकदम चालू लागली. जाताना पुन्हा वाकून नमस्कार करायला ती विसरली नाही. तपन पण 'माझा आता सत्कार आहे' सांगून आम्हाला नमस्कार करून त्याच्या खोलीकडे गेला... ते दोघं गेल्यावर त्यांची आई मोहनला म्हणाली, 'काही गंभीर बाब आहे का भाऊजी ?' तसं मोहननं त्यांना सारं काही स्पष्ट सांगितलं. दोन मिनिटं आई-वडील दोघेही एकदम गंभीर झाले. आई आम्हा दोघांना म्हणाली, 'माझ्याबरोबर आत येता काय ?' तसे आम्ही सगळेच तिच्या पाठोपाठ आत निघालो. स्वच्छता, टापटीप सगळीकडेच नजरेत भरणारी होती. एका खोलीचं थोडं उघडंच असलेलं दार पूर्ण उघडून आम्हाला आत यायला सांगितलं. समोरचा नजारा बघून मी तर थक्क झालो. उत्तम देव्हारा, बाजूला तीन फूट उंचीची समई, चंदनाच्या अगरबत्तीचा सुवास संपूर्ण खोलीत, खोलीत कसला संपूर्ण देवघरातच दरवळत होता. नुकतीच पूजा झाली होती हे स्पष्ट होते. मोहनला ती म्हणाली, 'मला यांनी एक दिवसही माझी पूजाअर्चा थांबू दिली नाही. उलट आपल्या नमाजाची सर्वात मोठी पवित्र जागा लग्न झाल्या झाल्या मला रिकामी करून दिली. तुम्हाला माहीत आहेच माझा निर्णय पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांना, आमच्या मोठ्या कुटुंबाला केवढा हादरा देऊन गेला होता. समाज ढवळून निघाला होता. तेव्हा तुम्हीच आम्हाला आधार दिला होता. तुम्हाला वाटतंय का माझी मुलगी केवळ वेगळ्या धर्मामुळे त्यांना त्याज्य होईल? आम्हा दोघांनीही मुलांनी १३ / तरंग अंतरंग