पान:तरंग अंतरंग.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझी पूजा अगदी लहानपणापासूनच पूजा माझ्या मागे लागली. ही पूजा म्हणजे देवपूजा. मागे लागली म्हणणे अजिबात बरोबर नाही; पण ते बालपण होते. वडील अत्यंत वक्तशीर असल्याने काटा साडेआठवर टेकतो न टेकतो, तोच ते दवाखान्यात हजर व्हायचे आणि दीड वाजता जेवायला यायचे. पुन्हा दोन-अडीचला दवाखाना असायचाच. दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून गंभीर आजार झालेली जनावरे घेऊन शेतकरी भल्या सकाळीच किंवा रात्रीच मुक्कामाला येऊन ऐसपैस जागेत जनावरांसह विश्रांती घेत. बिचारे कोरडी कांदा-भाकर फडक्यात बांधून आणत. चाऱ्याची व्यवस्था मात्र पांजरपोळ करत असे. कधी-कधी एखादा शेतकरी आपल्या लहानग्याला पण बरोबर आणत असे. आमच्या घराच्या खिडकीच्या जवळच झाडाच्या गार सावलीत बसून बाप-लेक, नातू, आजा कोरडी भाकरी घशाखाली ढकलत असत. कसलाही आळस न करता पाण्याचा तांब्या त्यांना द्यायची सक्त ताकीद नानांनी, म्हणजे माझ्या वडिलांनी केली होती. त्यांनी जेवायला फडकं उघडलं की, माझ्या अत्यंत कनवाळू आईची नजर खिडकीतून त्यांच्यावर पडत असे. नव्हे; ती लक्ष ठेवूनच असे. तोंडी लावण्यास नुसती चटणी असेल तर माझ्याकरवी पाण्यासोबत लोणचं, आमटी, भाजी यातलं जे असेल ते बाप-लेकांना पुरेलसं देत असे. त्यांच्या डोळ्यातले भाव मी कधीच विसरू शकणार नाही. आईकडे पाहत बाप हात जोडत असे. मला तरी त्याची प्रेमानं भरलेली ती नुसती नजर आई अंबाबाईनं दिलेल्या आशीर्वादासारखी वाटायची. आईची आमच्याकडच्या सर्वच नोकर-चाकरांवरची माया मला वेगळेच संस्कार देऊन गेली. जे आयुष्यात आजही मला अत्यंत 'श्रीमंत' करून मनात आनंद लहरी उत्पन्न करतात. आईइतके मला कधीच जमणार नाही. कारण हे करण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागत. आई लोणचे करी, ते दोन-तीन मोठ्या बरण्या भरून. सांडगे - पापड - कुरडया वर्षाच्या गरजेपेक्षा जास्त. आता मला त्यामागचे गुपित समजते. यासाठी मसाल्याला लागणारे जिन्नस भाजून उखळात कुटणे, निवड- पाखड करणे. सारे सारे ती एकहाती करत असे. बाजारात तयार मसाला विकायचा आणि विकत घ्यायचा तो काळ नव्हता. आईला कधीही गप्प बसून राहिलेली मी पाहिलीच नाही. त्यात घरी पाहुण्यांची, नातेवाईकांची नुसती वर्दळ असायची. त्यामुळे मोठ्या गरम पाटीत स्वतः जोंधळे भाजून मोठ्ठा डबा भरून लाह्या ; ताकात कालवून द्यायला लाह्यांचे पीठ वगैरे कायम हाताशी ठेवावे लागे. आईच्या बाजूलाच बसून ते लाह्यांचे ताड-ताड आवाज करत फुलासारखे फुलणे अनुभवणे हा एक आगळाच नजारा असे. मी अधून-मधून गरम लाह्यांची फक्की मारत एकटक हे सर्व पाहत असे. आईचा गोरापान चेहरा लालसर झालेला पाहणे, हेही एक कुतूहल असे. आईच्या हातचा गरम, ताज्या लाह्यासारखा एकही पदार्थ आई गेल्यापासून मी खाल्लेला नाही. अशामेव्याचा फडशा कधी-कधी पाहुण्यांच्या अचानक तरंग अंतरंग / १२८