पान:तरंग अंतरंग.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पडणाऱ्या धाडीमुळे एकाच दिवसात उडत असे; पण आईच्या चेहऱ्यावर कधीही नाराजीची अठी मी पाहिली नाही; उलट तान्ह्या बाळाला त्याच्या जावळावरून हात फिरवत पाजताना फुटलेल्या पान्ह्यामुळे मातेच्या चेहऱ्यावर झळकणारे स्वर्गीय सुखाचे अतोनात समाधान मी तिच्या चेहऱ्यावर कैकदा पाहिलं आहे. तर सांगायचं म्हणजे नानांच्या रोज उशिरा येण्यामुळे तिला पूजेसाठी मला कळवळून विनंती करावी लागे. त्यासाठी जेवताना शिरा, निखाऱ्यावर भाजलेली हिरवीकंच मिरची, अदमुऱ्या दह्याबरोबर मेतकूट, असली आमिषे देणे तिला भाग पडत असे. विशेषतः शनिवारी, सकाळची शाळा संपवून पोटात कावळे बोंबलत असताना दप्तर फेकल्यावर आईला मला लाडीगोडी लावायची जय्यत तयारी करावी लागे. कधी- कधी मावशीला ती म्हणत असे, "आता अन्याबा ( - ती मला अन्याबा म्हणे - ) बघ हं, कशी नक्षत्रासारखी पूजा करतो ते. पुजाऱ्याला सुध्दा नाही जमणार." बस, मग मी खरंच भूक विसरून सुंदर पूजा मांडत असे. म्हणूनच की काय, आयुष्यात परमेश्वराने माझ्या लायकीपेक्षा कायमच भरघोस यश नेहमीच माझ्या पदरात टाकले. संध्याकाळी दिवेलावणीच्या अगोदर येऊन हात-पाय धुतल्याशिवाय देवापुढे 'शुभंकरोती...' म्हणायला बसायचे नाही. रात्रीच्या जेवणाअगोदर रोज नानांच्या बरोबर फेऱ्या मारत म्हणायची 'रामरक्षा' आजही मला तोंडपाठ आहे. घरी दाखल होणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ पाहुण्यांना वाकून नमस्कार करणे, हा एक संस्कारच माझ्यावर झाला. माझे हे जे काही बरे-वाईट व्यक्तिमत्त्व आहे, त्याला केवळ हे संस्कारच कारणीभूत आहेत. त्यासाठी मी सदैवच या साऱ्या गोष्टींसाठी आजन्म कृतज्ञ आहे; आणि शेवटपर्यंत राहणार आहे. हळूहळू मला पूजा करण्यात आनंद आणि समाधान वाटू लागले. आजही जेव्हा मी पूजा करतो, तेव्हा आता पण एक गणपतीची मूर्ती सोडून बाकी सर्व मूर्ती बदललेल्या असल्या, तरी बालपणीच्याच सर्व मूर्ती डोळ्यांपुढे हसतमुख उभ्या राहतात. त्यामुळेच देवाबरोबरच आई-वडील, काका-काकूंच्या समोर नसलेल्या फोटोलाही मी नकळत घट्ट हात जोडून फक्त मनोमन 'सर्वे सुखीनः संतु...' एवढीच प्रार्थना म्हणत डोळे मिटतो. १२९ / तरंग अंतरंग