पान:तरंग अंतरंग.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अत्यंत धाडसी, चपळ, इमानदार घोडा, 'चेतक' यांची आठवण गळ्यात रुतली. राजा मानसिंगाच्या प्रचंड सेनेबरोबरच्या 'हल्दीघाटा'च्या लढाईत 'चेतक'ने राणाला पाठीवर घेऊन, गर्दीत घुसून राजा मानसिंगाच्या हत्तीच्या सोंडेवर उडी घेतली होती. राणा प्रतापाचा भाला माहूत आड आल्याने मानसिंगाचा कंठवेध घेऊ शकला नाही. या हल्ल्यामुळे राणा प्रताप आणि 'चेतक' जखमी झाले; पण धन्याला वाचवायचंच, या जिद्दीनं प्राण कंठाशी असताना पण एक शेवटची झेप सीमेवरची नदी ओलांडून आपल्या राज्याच्या हद्दीत घेतली. प्राण सोडणाऱ्या आपल्या 'चेतक'चे मस्तक मांडीवर घेऊन प्राण्यासाठीही ओक्साबोक्शी रडणाऱ्या राणानं वाहिलेली 'श्रद्धांजली' आजही हळदी घाटातील प्रमुख स्मारक होऊन राहिली आहे. धन्य तो राणा आणि धन्य तो चेतक...! अशीच गोष्ट आमच्या 'ट्विटी'ची. गेली पाच वर्षे आमच्याकडे असलेला अतिशय गोंडस, सदा-सर्वदा घर जागतं, उत्साही ठेवणारा 'ट्विटी' मी शिकवलेलं 'आता विश्वात्मके देवे...' आवाजातील चढ-उतारांसह उत्कृष्ट गात होता. तानसेनाने 'मल्हार' राग (बहुधा मी यातला जाणकार नव्हे) सुरू केल्यावर वरुणराजाला अवनीवरती सडा शिंपावा वाटायचा. त्याला तानसेनाला मृद्गंधाने न्हाऊ घालावं वाटायचं. इथं आमच्या पक्ष्याच्या या सुरांनी मी डोळे मिटून धुंद होऊन शांतपणे ज्ञानेश्वरांच्या ध्यानी मन झालो... त्याच्या या अचानक सुरू असलेल्या 'विश्वात्मके देवे' गायनाचा शेवटचा स्वर उगीचच थोडा गंभीर झाल्यासारखा वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी कासावीस होऊन त्यानं कायमची मान टाकली. आदल्या दिवशी त्यानं अचानकच 'पसायदान' का म्हटलं याचं कोडं माझ्या मनातून हटता हटना त्याच्या एवढ्याशा मेंदूला तसं का वाटलं असावं. याचा अचंभा आजही आमच्या सर्वांच्याच मनात तसाच कायम आहे. अत्यंत जड मनाने मी, माझा नातू आणि तातडीने कॉलेजमधील पीरियड सोडून खिन्न होऊन आलेली माझी सून, असं तिघांनी मिळून एका बॉक्समध्ये मीठ घालून त्याला मिठाने पूर्ण झाकलं. त्यानंतर सांगलीवाडी येथील आमच्या शेतात चिरशांतीच्या 'बिछान्या' वर त्याला सोडून आलो... हीच आमची साधी श्रद्धांजली ! घरी उघडा- वाघडा पिंजरा तो देखील त्याच्या तिन्हीत्रिकाळ चालणाऱ्या हैदोसाचा साक्षीदार. आमच्याएवढंच खिन्न होऊन दार उघडं टाकून 'ट्विटी'ची आर्ततेने वाट पाहत होता.....

१२७ / तरंग अंतरंग