पान:तरंग अंतरंग.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकरीचे विणकाम तिच्याकडून शिकला. ते शिकणं कदाचित तिला तिच्या वेदनांपासून परावृत्त करण्यासाठीचा बहाणाही असेल... तिला त्रास होऊ नये यासाठीची त्याची ती काळजी अफलातून. त्याच्या त्या अव्यक्त भावना माझ्यासाठी अनमोल आहेत. या गोष्टींची आठवण होणे, म्हणजे तिला श्रद्धांजली वाहिल्यासारखेच मला वाटते. इतर भावांनी व वहिनींनी अशीच आपली जबाबदारी पार पाडली. आज दुर्दैवाने चारही भाऊ, काका, काकू, नाना, आई कुणीही हयात नाही; पण त्यांनी दिलेल्या या संधीसाठी मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. ज्यामुळे आमच्या ऐसपैस कुटुंबाला एक घरचा उत्तम डॉक्टर मिळाला. आरोग्याबाबत आम्ही सारेच निर्धास्त झालो. श्रीकांत डॉक्टर झाल्याने फक्त आमच्या साऱ्या कुटुंबांच्या आरोग्याची जबाबदारी नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येकाच्या सासर-माहेरकडील कुणीही मंडळी, काही जवळच्या मित्रमंडळींच्यासुद्धा संपूर्ण आरोग्याची काळजी (एक पैसाही न घेता ) त्याने स्वतः वर घेतली आहे. अत्युच्च श्रद्धेने, सेवाभावाने व सध्याच्या काळात क्वचित पाहायला मिळणाऱ्या प्रामाणिकपणे त्याने आपले हॉस्पिटल चालवले आहे. त्याच्या निष्णात कौशल्याचा उपयोग वेदनेने व्याकुळ झालेल्या समाजातील अनेकानेक व्यक्तींना होत आहे. आता तर मुलांना डॉक्टर करणे फक्त आई-वडिलांना; विशेषतः मध्यमवर्गीय लोकांना अशक्यच आहे. अशा वेळी जवळच्या नातेवाईकांनी, चुलत, सख्खे, मावस, आत्येभावांनी मिळून असेच एकत्र बसून कुटुंबातील एखाद्या हुशार मुलाला / मुलीला डॉक्टरी पेशासारख्या सेवाभावी पेशाकडे वळवले, तर त्या साऱ्या कुटुंबाबरोबरच समाजासाठीपण एक पुण्याईचे काम ठरेल. विशेषतः ९५ टक्क्यांच्यावर मार्क्स मिळूनही आरक्षणात न बसणाऱ्या समाजासाठी आपली मुले पुढे डॉक्टर, आयआयटी किंवा इतर उत्तम क्षेत्रात स्थान मिळवावीत म्हणून आमच्या पूर्वपिढीने दाखवून दिलेला हा मार्ग नक्कीच सर्वोत्तम आहे. म्हणूनच आमच्या कुटुंबात घडलेले हे उदाहरण व्यक्तिगत असूनही सर्वांच्यासाठी एक उत्तम मार्ग ठरू शकतो. असे वाटल्याने ही आठवण आपणा सर्वांसाठी लिहिली आहे.

१२१ / तरंग अंतरंग