पान:तरंग अंतरंग.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुंडलिका बघता-बघता मी रोह्याला दहा वर्षं काढली, नोकरीची सुरुवात खोपोलीला झाली, तरी पेपर मिलमधील खरे कष्ट आणि ज्ञान रोह्याच्या पेपर प्रॉडक्ट्सने दिले. मॅनेजमेंट, लेबर आणि त्यांची युनियन्स वगैरेचे इथे मिळालेले ज्ञान माझ्या पुढील आयुष्यातील कंपनी प्रेसिडेंटच्या कारकिर्दीत खूपच उपयोगी ठरले. इथेच श्री. वसंत खानोलकर यांच्यासारख्या महान कामगार नेत्याशी जवळीक निर्माण होऊन कामगारांच्या प्रश्नांची सखोल ओळख झाली. सांगलीच्या पुरात पोहण्याच्या नादाने इथली कुंडलिका नदी छोटी असली तरी खूपच भावली. बहुधा सुट्टीच्या दिवशी एक साबणाची वडी व ढीगभर आठवड्याचे कपडे घेऊन दोस्तांच्या बरोबर नदीकाठी दोन - चार तास तरी सहज मजेत जायचे. नदीकडेचा बराच भाग मोकळा, खडकाळ होता. कपडे धुऊन झाले की खडकावर वाळत टाकून आम्ही मस्तपैकी वाहत्या पाण्यात उड्या मारत डुंबत राहत असू. माझा परममित्र सुभाष कुळकर्णी हमखास बरोबर असे. त्याच्या डब्यात चिकन किंवा सुकट, कोळंबी, मासे आले की, सगळेच तुटून पडत. त्याला बिचाऱ्याला मात्र पोळीभाजीच खावी लागे. पुढे - पुढे तर माझा मुलगा अनिरुद्ध शाळा सुटल्यावर बाऊ म्हणजे कोळंबी खायला थेट त्याचंच घर गाठत असे. - रोह्याला भयंकर म्हणजे ९०-९० इंच पाऊस पडे. मोठ्या पुलाच्या कमानी भरून लाल पाणी उधळलेल्या घोड्यासारखे कमानी खालून खिंकाळत, उसळून बाहेर येई. सारा गाव पूर बघायला पुलावर हजर असे; पण पुरात कुणी पोहत नसे. एके दिवशी संध्याकाळी आम्हीही मिलमधले ऑफिसर्स तेथे पूर बघायला आलो. आमच्या एम. डी. चा जावई म्हणाला, "या पुरात उडी मारेल त्याला १० रुपये." झालं. एवढं म्हणायचाच अवकाश. मी व कराडचा पर्सोनेल ऑफिसर, त्यालाही 'कृष्णे'चा दबदबा माहीत. कपडे काढून तयार. सुभाषही तयार झाला; पण थोडा साशंक होता. कारण काठाला लागण्यासाठी दूरवर एक 'जेट्टी' होती. तेथपर्यंत अतिवेगवान, उसळत्या प्रवाहाबरोबर पोहणे भाग होते... सारा गाव एकत्र गर्दी करून टाळ्या-शिट्या वाजवू लागला. त्यांना ही नवलाईच होती. सांगलीला याच्या दहापट पाण्याची खोली आणि वेग असतो तरी पण अनेक जण उड्या टाकत. त्यामुळं फारसं कौतुक नसे. बघता-बघता आम्ही तिघेही प्रवाहात वेगळे झालो. खूप अंतर पडले. सुभाष 'जेट्टी' बरीच लांब असताना भेंडाळला. तसा मीही दमलो होतो; पण बिनधास्तपणे पोहोत होतो. आता मला सुभाषची काळजी वाटू लागली. 'जेट्टी' वर उभ्या असलेल्या जावयाला तर घाम फुटला. पैज त्यानं लावलेली ना. लोकांचा पण आरडाओरडा सुरू झाला. सुभाषला ओळखणारे त्यात खूप होते... अचानक कुठून ऊर्मी आली नकळे पण प्रचंड ताकदीनं पाणी कापत मी वेगानं तरंग अंतरंग / १२२