पान:तरंग अंतरंग.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीळही वाटून घ्यावा पूर्वी वास्तविक घरात येणारा पैसा कसाबसा कुटुंबाला जगवण्यास पुरेसा असे. पण ज्यांच्या डोळ्यांसमोर स्वतःचे कष्टमय आयुष्य असते, त्यांनाच इतरांच्या कष्टाची जाण असते. स्वातंत्र्यपूर्व गोव्यातील अनेक मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षणासाठी त्याकाळी सांगलीत येत असत. वार लावून कुठे ना कुठे जेवणाची सोय करत; न झाल्यास चणे-चुरमुरे खाऊन पाणी पिऊन दिवस ढकलत असत. कधी कधी अंगणात नाना बसलेले असत. रस्त्यातून जाणाऱ्या एखाद्या अशा विद्यार्थ्याला पाहिले की, त्याच्या चेहऱ्यावरूनच नानांच्या लक्षात येत असे की, हा मुलगा जेवलेला नाही. अशावेळी ते त्याला बोलावीत, "जेवलास काय रे?" विद्यार्थी मानेनेच नकार देई. मग नाना, "अगं, याला जेवायला वाढ, " असा आईला तेथूनच निरोप देत. "जा आत. हातपाय धू आणि पोटभर जेवून घे, " असे विद्यार्थ्याला सांगत. परत जाताना त्याचे कुठले कुठले वार नाही लागले, याची चौकशी करत व "जोपर्यंत ही सोय होत नाही, तोपर्यंत उपाशी राहायचे नाही; इथेच जेवायचे, " अशी आज्ञाच देत. वडिलांना बहुधा कधी तरी आपल्या शिक्षणकाळातील कठीण दिवस डोळ्यापुढे दिसत असावेत. आईसुद्धा तेवढ्याच प्रेमाने त्याला भाजी-भाकरी वाढत असे. स्वयंपाकघर आवरून झाले असले, तरी तिच्या कपाळावर कधीही नाराजीची आठी मी पाहिली नाही. कधी - कधी पाच-पाच विद्यार्थीपण आमच्या पंगतीला असत. ना त्यांची जात, ना ठिकाण, आम्हाला माहीत असे. ना वडीलही कधी त्यांना विचारीत. त्यांच्यासाठी विद्यार्थी उपाशी आहे, एवढेच पुरेसे असे. एकदा माझा मोठा भाऊ प्रभाकर बाहेरच्या दिवाणखान्यात बसलेला असताना दारासमोर एक आलिशान गाडी उभी राहिली. सुटाबुटातले एक गृहस्थ इकडे-तिकडे पहात आत्मविश्वासाने आत आले. भावापेक्षा वयाने लहान होते. आत आल्यावर त्यांनी भावाला एकदम वाकून नमस्कार केला. भाऊ थोडा मागे झाला आणि हात जोडून म्हणाला, "मी आपल्याला ओळखले नाही. " यावर तो गहिवरुन म्हणाला, "बरोबर आहे. खूप वर्षे झाली. मी शाळेत असताना या घराने मला जेऊ घातले आहे. मी सरकारी कामासाठी मिरजेस आलो होतो. जुन्या आठवणीमुळे मुद्दाम इथे आलो. घर हुडकायला काहीच त्रास झाला नाही, विसरणे शक्यच नाही. दुर्दैवाने त्यांना भेटायला आई किंवा नाना हयात नव्हते. पण त्यांनी इतक्या वर्षांनी मुद्दाम भेटून व्यक्त केलेली कृतज्ञता अविस्मरणीय ! आम्हा साऱ्यांना आई-वडिलांच्याबद्दल वाटणारा अभिमान या एकाच प्रसंगाने द्विगुणित झाला. कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं पुण्य अजूनही अमाप आहे, पुरून उरलंय !

११९ / तरंग अंतरंग