________________
नागाव हापूस आंब्याच्या दिवसात मला नेहमी माझ्या लहानपणीच्या अंब्याच्या दिवसांची आठवण येते. लहानपणी 'पायरीऽऽ हापूसऽऽ' असे ओरडत डोक्यावर एक आणि हातात एक करंडी घेऊन बहुधा कोकणी किंवा क्वचित युपीतला भैय्या दारावरून ओरडत जात असे. मग त्याला बोलावून बराच वेळ घासाघीस करून एखाद-दुसरी करंडी घेतली की, घरी घमघमाट पसरत असे. त्यानंतर आमरस - पोळीचा थाट मांडला जात असे. पण मला आठवतात, ते हापूस आंबे नव्हे, तर माझ्या बहिणीच्या घरचे, इंदूकडचे शेतातून आलेले देशी, रसाळ, गोड गोटी आंबे. गोटी एवढ्यासाठी की, आम्हा लहान मुलांच्या हातातही एका मुठीत एक आंबा सहज बसत असे. तिचे शेत कोल्हापूरजवळच नागावला होते. आम्ही त्या आंब्यांना 'नागाव हापूस' म्हणत असू. एक अख्खी खोली आंब्यांनी भरलेली असे. बहीण इंदू एक दुरडीभर आंबे मध्ये आणून ठेवत असे आणि भोवतीने सारे बसून चढाओढीने अगदी स्वच्छ दिसतील, एवढ्या कोयी आणि उलट्या करून साली तल्लिनतेने चोखत असू. त्यामुळे हल्लीसारखं एखादा आंबा चिरून सगळ्यात फोड फोड वाटून व एखाद्या नशीबवंताला कोय, अशी वाटणी होत नसे. शर्ट, बनियन (तेव्हा बनियनला 'गंजीफ्रॉक' का म्हणत होते कुणास ठाऊक? फ्रॉक का ?) खुंटीला अडकवून एक-एकजण दहा-बारा आंबे सहज बसल्या बैठकीला हाणत असू. हातात आंबा धरून देठावर बोट ठेवून दुसऱ्या हाताने गोलगोल फिरवत कोयीपासून रस सोडवून आंबा पुष्ट आणि मऊ झाला की मग हळूच देठ काढून, ओठात धरून पातेल्यात पिळल्यासारखा पिळत असू. रसाची एखादी चिळकांडी कुणा-कुणाच्या अंगावर अचूक उडत असे, म्हणून शर्ट वगैरे काढून बसावे लागे. आंबे आले की, आम्हा साऱ्यांच्या घरी बहुधा पोस्ट कार्डाने निरोप येई - 'आंबे आलेत, बाळगोपाळांचे सैन्य रवाना करा.' यासाठी प्रत्येकाला वेगळे आमंत्रण लागत नसे. एक कार्ड वाचून सर्वच नातेवाईकांना, 'आपल्याला बोलावले आहे,' असे हक्काने वाटे. वेगळ्या आमंत्रणाचे 'एटिकेट्स' पाळावे लागत नसत. पोचलेल्या दिवशीच दुपारच्याच बसने सर्व चुलत- मावस-आतेभाऊ-बहिणींचा गोतावळा कोल्हापूरला, '१२, सन्मित्र'ला डेरेदाखल होत असे. तो आठवडा तरी दिवसभरात निशाणावर फक्त नागाव हापूसच असे. गेले ते दिवस आणि गायब झाली ती आपुलकीने अगत्याने साद घालणारी माणसं ! वाटीभर रत्नागिरी हापूसचा आमरस खाऊनही वर आठवण निघते ती 'नागाव हापूस' चीच. पुढे आमचे मेहुणे, बापू गेले. बहीणही गेली. तेव्हापासून आम्ही कोणी तिकडे कधी फिरकलोच नाही ; बहुधा ते आंब्याचे झाडही वठले असावे.
तरंग अंतरंग / ११८