________________
वशिष्ठ ऋषी बसलेत आणि आपल्यावर चिडून लालभडक झालेल्या डोळ्यांनी वारंवार चुकणारा मंत्र मला परत-परत सांगत असल्याचे दिसले आणि भीतीचा काटा सर्रकन् अंगावरून सरकला. त्याचं कारण म्हणजे 'त्या' पेटत्या लाकडाला स्वामींनी घातलेला हात. हे फक्त राख झाडण्यासाठीच त्यांनी केलं होतं, हे माझ्या लवकर लक्षात आलं म्हणून बरं ; नाही तर मी पळूनच गेलो असतो. " वर्षातून एकदा मोठं 'अन्न सदावर्त' इथं आम्ही करतो, " स्वामी म्हणाले. आता माझीही भीड चेपली होती. रांगेतल्या त्या 'दगडूशेठ' च्या अस्वस्थ हालचालीकडे सपशेल दुर्लक्ष करून मी त्या ऋषींना विचारले, "इथं तर चार-पाच महिने पूर्ण बर्फ असतो, तेव्हा तुम्ही कुठे असता?" "आम्ही कुठेही जात नाही; फक्त हे दार बंद करून घेतो, मी आणि ही धुनी. " स्वामींनी शांतपणे उत्तर दिले. मला इतर काहीही बोलण्याचे धाडस झाले नाही. त्या 'महापुरुषा 'नेही माझे पुण्य संपल्याचे मानेच्या इशाराने सांगितले. माझ्या पाकिटात होते ते सर्व पैसे धुनीच्या बाजूला ठेवले. धुनीतून काढून अत्यंत प्रेमाने दिलेला तो मूठभर अंगारा घेऊन मी बाहेर पडलो. परांजपे बाईंना मात्र स्वामी माझ्यापाशी बोलल्याचे पाहून हर्षवायू होतो की काय, याची भीती मला वाटली. त्यांनी वाकून माझे पाय धरण्याची केलेली तयारी वरच्या वर त्यांचे हात धरून मी थोपवली. हे असं होतं. मी सांगत होतो स्वामींची आठवण झाली ते रणजित देसाईंच्या 'स्वामी' या कादंबरीबद्दल. सकाळी माझा दोस्त डॉ. अनिल फणसोपकरला मी अमेरिकेतून परत आल्याचे सांगावे, म्हणून फोन केला. यावर आपल्याकडे होत असलेली इतिहासकालीन महान व्यक्तींचे जतन करण्यातली दुर्दम्य हेळसांड, याबद्दल तो बोलत होता. मला मात्र आठवले, 'स्वामी' वाचून मुद्दाम पाहायला गेलेल्या रमाबाईच्या थेऊर येथील हागणदारीने वेढलेल्या 'त्या' समाधीची कथा. यावर फणसोपकरने त्याच्या हाती 'स्वामी' कुण्या एक दोस्तानं सकाळी-सकाळी कशी ठेवली, वाचायला सुरुवात केल्यावर सरळ 'आमराई' गाठून तहान-भूक सारं विसरून झाडाखाली बसून संध्याकाळपर्यंत ती संपवूनच कसं घरी परतलो याची गोष्ट सांगितली. मनात आले, सरकारी स्मारक जतन करणं गेलं खड्ड्यात. या माझ्या दोस्तान जतन केलेलं रमाबाईंचं स्मारक हजारो वर्षं त्याच्या अनेक पिढ्यांत चालू राहील, यात संशय नाही.....
तरंग अंतरंग / ११४