________________
चूप राहण्यास सांगितलं. महादबानं कानावरची अर्धवट प्यालेली विडी पेटवली आणि तीक्ष्ण नजरेनं सभोवार पाहू लागला. आम्ही पण पाणी पिणार, एवढ्यात त्यानं पुन्हा दोन्ही हात पसरून आम्हाला गप्प केलं. मुकाट्यानं बाटली तशीच, पाणी न पिता आत टाकली. न जाणो पाणी पिण्याच्या आवाजानं ससा सावध व्हायचा! त्यानं बोटानं दाखवलेल्या दिशेने सुधाकरनं बंदूक सरसावली. एवढ्यात एक मस्त, गुबगुबीत, पांढराशुभ्र ससा वालाची शेंग सोडून रुमाट पळाला. त्याला एवढ्या लांबून चाहूल कशी काय लागली असेल ? ससा बघून मनात आलं, 'इतक्या मस्त, निष्पाप बिचाऱ्याला आपण का मारून खावं?' या विचाराने माझी तरी सशाची भूकच संपली. सुधाकरनं पण बंदूक नाही चालवली. तो म्हणाला, "पळणारा ससा नाही मारता येत, म्हणूनच आपली चाहूल लागू द्यायची नाही; शिवाय बंदुकीच्या एका बाराच्या आवाजानं सारेच ससे गायब होतात." मला मात्र तो ससा मेला नाही, याचा मनातून आनंदच झाला. दुपारचे बारा वाजत आले होते आणि भूक लागली होती. ससा खायचा म्हणून नाश्ताही केलेला नव्हता. कुजबुजायचं पण नाही, अशी म्हादबाची सक्त ताकीद होती. सशाचा तर पत्ताच नव्हता. जंगल एवढं घनदाट की, आम्ही कुठे आहोत, हेच कळेना. काहीही न कुजबुजता चालणं आम्हा दोघांना जड जाऊ लागलं आणि आम्ही थोडे सावध चालत मागेच राहिलो. गप्पांत रंगलो आणि 'त्या' दोघांचा आम्हाला मागमूसही लागेना. आम्ही कुठं आहोत, हेही कळेना. पोटात भीतीचा गोळा आला. आम्ही बरीच पायपीट केली, तेव्हा एक दिशेला थोडा उजेड वाटला आणि आम्ही डोंगराच्या बरोबर उलट्या बाजूला जंगलातून बाहेर पडलो होतो. बापरे..! म्हणजे आता घरी जायला ७-८ किलोमीटर पायपीट करावी लागणार होती. कसेबसे चार वाजता घरी पोचलो. दारातूनच ओरडलो, "अगोदर स्वयंपाक कर. आम्हाला भूक लागली आहे." चेहऱ्यावरून आमची झालेली पायपीट बायकोच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. "का? चालून चालून ससा पचवलात की काय?" असे म्हणत पदर कमरेला बांधून एक चिडवणारे हास्य फेकून ती स्वयंपाकाला लागली. एक प्रश्न मात्र मला आजही सतत छळतो. नुसती मल बघून ते जनावर वाघ नसून वाघीण होती, हे त्यानं कसं काय ओळखलं असेल बुवा...!
१०७ / तरंग अंतरंग